आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूर फवारणीची सर्व कंत्राटे केली रद्द!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगबाद - आठ वर्षांपासून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाच्या वतीने हडको-सिडकोतील २० वॉर्डांसाठी पाच ठेकेदारांना फॉगिंगचे (धूर फवारणी) काम देण्यात आले होते. त्यासाठी दरमहा दहा लाख ४५ हजार रुपयांचा चुराडा केला जात होता. एवढा खर्च होऊनही रोगराई आणि डासांवर कोणताच परिणाम होत नसल्याचे मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आरोग्य विभागाला ठेकेदारांचा ठेकाच रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

महानगर पालिकेच्या क्षेत्रातील आरोग्याच्या वाढत्या तक्रारी तसेच चिकुनगुन्या, डेंग्यूसारख्या रोगांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याने केंद्रेकरांनी आरोग्य विभागाची गुरुवारी रात्री ९.३० पर्यंत मॅरेथॉन बैठक घेतली. यात धूर फवारणी तसेच औषध फवारणीबाबत त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. यात औषधाचे किती प्रमाण असावे याचेही उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत थेट ठेकेदारांचे ठेकेच रद्द करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ. सुहास जगताप यांना दिले. फॉगिंग औषध फवारणीचे सर्वच ठेके एकदाच रद्द करून हे काम मनपाच्या कर्मचाऱ्यांवर काम सोपवण्याची महापालिका इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. महानगर पालिकेत मलेरियाचे ९१ कर्मचारी असून त्यांना दुसऱ्या कामांना नेमून वेतन देण्यात येत होते. तर फवारणीचा ठेका देऊन अधिकारी काम भागवत होते. गेल्या आठ वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.

२० वॉर्डांतच ठेकेदारांकडून काम
शहरात एकूण ११३ वॉर्ड असले तरी, नियुक्त पाच ठेकेदारांवर केवळ हडको सिडको परिसरातील २० वॉर्डांची जबाबदारी होती. दोन वॉर्डांत एक ठेकेदार आणि त्यांना त्यासाठी दरमहा दोन लाख रुपयांची रतीब मनपाकडून देण्यात येत होती. त्यानंतरही डासांचा उपद्रव कायम आहे.

यंत्रातून निघाला केवळ धूर
केंद्रेकर मॉर्निंग वाॅकसाठी गेले असता त्यांनी फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता त्याने या यंत्रात औषध वगैरे काही नसून केवळ धूर फवारणी केली जात असल्याचे सांगितले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आरोग्य विभाग आणि ठेकेदारांची बैठक घेऊन नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळून मनपाच्या पैशांची उधळपट्टी करू नका, असे ठणकावले होते. त्यानंतरही काहीच बदल झाला नसल्याने केंद्रेकरांनी सर्वच ठेके रद्द करण्याचे आदेश दिले.

चांगला निर्णय
^उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होऊ शकतात. यापूर्वी आरोग्य विभागाला तशा सूचनाही केल्या होत्या. या निर्णयाचे स्वागत आहे. विजय औताडे, आरोग्यसभापती, मनपा

मनपाच करणार फवारणी
मलेरियाच्या ७० कर्मचाऱ्यांना दोन वॉर्डांत धूर फवारणीची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांना दरमहा वेतनात एक हजार रुपये वाढही दिली जाणार असून १० लाख ४५ हजारांचा खर्च थेट ७० हजार रुपयांवर आणला गेला. दहा कर्मचारी राखीव ठेवून आजारी कर्मचाऱ्यांच्या जागी त्यांना पाठवण्यात येईल. एक कर्मचारी शहरातील सर्व व्ही. आय. पी. लोकांसाठी असेल. हायकोर्ट कॉलनीसाठी दोन कर्मचारी, तर नारेगाव कचरा डेपोवर दोन कर्मचारी असतील.
बातम्या आणखी आहेत...