आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation's Potholes Repaired Autoraksha Driver

'मनपा'चे खड्डे बुजवण्याची रिक्षाचालकाची धडपड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जागोजागी खड्डे पडल्याने शहरात एकही रस्ता चालण्याजोगा राहिलेला नाही. रस्त्यांची ही दुर्दशा दूर करण्यासाठी एका अवलियाने चंग बांधला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सिडकोतील खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्याचे काम किराडपुरा येथील रहिवासी शेख नजीर करत आहेत. त्यांनी आतापर्यंत सिडकोतील अनेक खड्डे बांधकामाचा मलबा टाकून बुजवले असून स्मार्ट रस्त्यांसाठी त्यांची धडपड सुरू आहे.

जालना रस्त्यासह अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी अनेकदा आवाज उठवूनही रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी महापालिकेने काही रस्त्यांची मलमपट्टी केली. मात्र, दोन दिवस झालेल्या पावसामुळे मनपाचे पितळ उघडे पडले. त्यावर पांघरूण घालण्याचे काम शेख नजीर करत आहेत. नजीर लोडिंग रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रस्त्यांच्या अवस्थेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव असल्याने ते गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील बांधकामाचा मलबा सिडकोतील रस्त्यांवर खड्ड्यांत टाकून डागडुजी करत आहेत. या प्रयत्नामुळे आझाद चौक ते बजरंग चौकादरम्यान अठरा मोठे खड्डे बुजवण्यात आले.

नागरिकांनी दखल घेतली!
नजीरयांनी टीव्ही सेंटर ते राणाजी मंगल कार्यालय, बळीराम पाटील चौक ते ओंकार गॅस एजन्सी मार्गावरील सुमारे पंधरा खड्डे बुजवले आहेत. नजीर यांच्या या उपक्रमाची दखल परिसरातील नागरिकांनी घेतली. मात्र, मनपाने खड्डे बुजवण्याची तसदी घेतलेली दिसत नाही.
स्वत: पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजवणाऱ्या रिक्षाचालकाचा अभिमान वाटतो. त्या अवलियाचा सत्कार केला पाहिजे. खड्डे बुजवण्यासाठी सिडकोतील नगरसेवकांनी पुढे यावे. शैलेश अंबेकर, रहिवासी, सिडको.

गेल्या काही दिवसांपासून एक रिक्षाचालक रस्त्यावरचे खड्डे स्वत:हून बुजवतो आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. हे काम कर वसुली करणाऱ्या मनपाचे आहे. मात्र, पालिकेने दुर्लक्ष केल्याचे वाईट वाटते. सुधीर कुलकर्णी, रहिवासी,सिडको.

काम सुरूच ठेवणार
मी लोडिंग रिक्षा चालवतो. मला खड्ड्यांचा प्रचंड त्रास होतो. खड्ड्यांमुळे झालेले अनेक अपघात पाहून मी खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. याचा वृद्ध प्रवासी, महिला वाहनधारकांना फायदा होईल. मी हे काम अखंडपणे सुरू ठेवणार आहे. शेखनजीर, लोडिंगरिक्षाचालक, किराडपुरा.

आयुक्तांनी दखल घ्यावी
शहराचीवाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात शहरातील नागरी सुविधांकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. शेख नजीर यांच्या कामाची दखल मनपा आयुक्तांसह सर्व नगरसेवकांनी घेण्याची मागणी नागरिकांनी केली.