आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपानेच केली झाडांची कत्तल, काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडवले लाकडे भरलेले वाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - "कुंपणानेच शेत खाल्ले' या म्हणीचा प्रत्यय शनिवारी महानगरपालिका प्रशासनाने दिला. सिद्धार्थ उद्यानातील धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटण्याच्या नावाखाली संरक्षण भिंती लगत असलेल्या दोन वृक्षांची कत्तल केल्याचे शनिवारी उघड झाले. या अवैध वृक्षतोडीला विरोध करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडलेल्या झाडांचे खोडे वाहून नेणारे वाहन अडवले. या वृक्षतोडीसाठी मनपाने स्वत:च कायदा मोडला. वृक्ष संर्वधन समितीची कोणतीही परवानगी घेता ही वृक्षतोड केल्याचेही समोर आले आहे.
पावसाळ्यात धोकादायक ठरू शकणा ऱ्या सिद्धार्थ उद्यानातील वृक्षांच्या फांद्या तोडण्याचे काम महागनरपालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र दोन वृक्षांच्या फांद्या तोडण्याबरोबरच उद्यानाच्या संरक्षक भिंतीच्या बाहेरील दोन वृक्ष बुंध्यातूनच तोडण्यात आले. मनपाच्या हद्दीतील वृक्ष तोडाचे झाल्यास मनपाच्याच वृक्ष संवर्धन समितीची परवानगी घ्यावी लागते. या समितीने प्रशासनाला केवळ फांद्या तोडण्याची परवानगी दिली होती. मात्र प्रत्यक्षात दोन वृक्ष तोडून परस्पर त्याची विक्रीही करण्यात येत असल्याचे काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष तथा वन विकास यंत्रणा समिती सदस्य खालेद पठाण यांनी सांगितले. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उद्यान अधीक्षकांकडे या वृक्षतोडीबाबत विचारणाही केली. मात्र त्यांना कोणीही नीट उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्यांनी तोडलेले वृक्ष घेऊन जाणारे एक वाहनच अडवून धरले.
सिद्धार्थ उद्यानातील झाडांच्या फांद्या तोडण्याच्या नावाखाली चक्क वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.

वृक्षतोडीला परवानगी नाही
मनपाच्या वतीने सिद्धार्थ उद्यानातील वृक्षांच्या धोकादायक फांद्या तोडण्यासाठी परवानगी मागितली होती. तशी परवानगीही देण्यात आली. मात्र वृक्ष तोडण्यास परवानगी देण्यात आली नाही. - दिलीप यार्दी, वृक्षसंवर्धन समिती सदस्य

धोकादायक फांद्या तोडल्या
पावसाळ्यात वृक्षांच्या फांद्या आणि वृक्षांमुळे संरक्षण भिंतीला धोका होता. म्हणून या फांद्या तोडल्या. यात वाळलेले वृक्षही आहेत. वरिष्ठांच्या परवानगीने हे काम करण्यात आले. -विजय पाटील, उद्यानअधीक्षक

वाघाच्या पिंजऱ्यांना धोक्याचा दावा
प्राणिसंग्रहालयातील काही झाडे वाळली आहेत तर काही झाडांच्या फाद्या धोकादायक बनल्या आहेत. पावसाळ्यात त्या प्राण्यांच्या पिंजऱ्यावर पडून अनुचित प्रकार घडू शकतो, म्हणून प्रशासनाने आज धोकादायक फांद्या, झाडे तोडण्याचे काम हाती घेतले होते. वाघाच्या पिंजऱ्यावर असलेल्या फांद्या तोडण्याचे काम करण्यात आले. मात्र त्याबरोबरच लाकूडतोड्यांनी उद्यानाबाहेरील दोन वृक्षही तोडून टाकून त्याची परस्पर विल्हेवाटही लावण्यात येत होती.
बातम्या आणखी आहेत...