आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पग, पश्मी, लॅब्राडॉरचे आकर्षण, महापालिकेच्या ‘श्वान प्रदर्शना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काही उंच आणि धिप्पाड, तर काही बुटके आणि चुळबुळे, काही लाजाळू तर काही उग्र, काही ठिपक्यावाले तर काही काळेशार, चमकदार अशा एक ना अनेक तऱ्हांच्या सव्वाशेपेक्षा जास्त श्वानांचे आगळेवेगळे असे श्वान प्रदर्शन रविवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर भरवले होते. सहसा पाहायलाही मिळणार नाहीत असे श्वान या प्रदर्शनाच्या निमित्ताने सर्वांसमोर आले होते. या श्वानांची आपल्या मुलांसारखी काळजी घेणारे मालक, त्याला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ओला टॉवेल करून त्याचे अंग पुसणारे, त्याला सारखे पाणी पाजणारे हे सारे औरंगाबादकरांसाठी मोठे अनोखे दृश्य होते.
रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो आणि महानगरपालिका औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जातिवंत (PURE BRED) श्वानांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनस्थळी श्वानांचे खाद्य तसेच त्यांच्या वापरासाठीच्या विविध वस्तूंचे स्टॉलही श्वानमालकांसह प्रेक्षकांना आकर्षित करीत होते. प्रदर्शनात १२३ श्वान सहभागी झाले होते. त्यात कारवान, पश्मी, लॅब्राडॉर, रॉटविलर, कॉकर स्पॅनिएल, डॅशहुंड, जर्मन शेफर्ड, पॉमेरॅनियन, डॉबरमन, पग, ल्हासा अँपसो, गोल्डन रेटरीव्हर, बॉक्सर, बूल मॅस्टिफ, ग्रेट डेन, बिगल, डालमेशियन, सेंट बर्नार्ड, अंकिता, बूल डॉग, पिट बूल आदींचा समावेश होता. ऑक्टोबरचे ऊन लक्षात घेता श्वानाला थांबण्याचे ठिकाण आच्छादित करण्यात आले होते. याशिवाय मैदानाच्या मध्यभागी श्वानाच्या परीक्षणासाठीचे रिंग होते. एका-एका जातीच्या श्वानांचे गट परीक्षणासाठी या रिंगमध्ये बोलावले जात होते. यात श्वानांची चाल, त्याचे दात, जबड्याची ठेवण आदींसह अनेक वैशिष्ट्यांची पाहणी परीक्षक अतिशय बारकाईने करत होते. श्वानाच्या प्रत्येक जातीचे वैशिष्ट्य, सवयी, रंग आदी सविस्तर माहिती श्वानतज्ज्ञ आणि मुख्य संयोजक डॉ. अनिल भादेकर देत होते. याचबरोबर कुत्रा कसा पाळावा, त्याचा आहार, आजार, देखभाल याविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

याकंपन्यांचाही सहभाग :या प्रदर्शनात श्वानांच्या वस्तू, विविध औषधीचे खाद्याचे स्टॉल उभारले होते. प्रदर्शनात भाग घेणाऱ्या सर्व श्वानांना फिडेल कंपनीच्या वतीने खाद्याच्या बॅग्ज भेट म्हणून देण्यात आल्या. तसेच पेडिग्री, द्रुल्स, वीरबॅक, सावावेट, पेट केअर, वेंकी, इंट्स, मेरील, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स, कास्टर अँड कास्टर अँड पुलोक या कंपन्यासुद्धा यात सहभागी झाल्या होत्या. मुंबईच्या केनेल या श्वानांच्या वस्तू तयार करणाऱ्या कंपनीने ४० श्वानांसाठी गिफ्ट दिले. प्रदर्शनस्थळीच श्वान पालकांना श्वानपरवाना देण्याची व्यवस्था महानगरपालिकेतर्फे करण्यात आली होती. या वेळी चाळीसपेक्षा जास्त श्वान परवाने काढण्यात आले. परीक्षक म्हणून प्रसाद मयेकर आणि मुकुंद जोशी यांनी काम पहिले.
यांनी मिळवला पुरस्कार
“बेस्टइन शो’चा मान पटकावला तो अभिजित सोनवणे यांच्या डॉबरमनने. द्वितीय पुरस्कार संदीप नागरे यांचा लॅब्रॉडॉर, तृतीय रहीम खान यांचा डॅशहुंड, चतुर्थ क्रमांक हरिहर बोडखे यांचा रॉटविलरने पटकावला. पाचवा क्रमांक गोल्डन रॉटविलर (डॉ. अष्टपुत्रे राघवेंद्र), सहावा कोकेन स्पॅनिअल (पी. एम. मॅथ्यूज), सातवा अंकिता (प्रकाश बोडखे), आठवा ल्हासा अँपसो (धनंजय वि. पाटील) तर भारतीय ब्रीडसाठीचा विशेष पुरस्कार कुलदीपक देशपांडे याच्या पश्मी श्वानाला मिळाला.

श्वानाचे कौशल्य
पोलिसांच्याबॉम्बशोधक आणि नाशक पथकामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे श्वानपथक तसेच गुन्हा तपासणीत गुन्हेगाराचा माग काढणारे श्वानांचे कौशल्य या वेळी सादर करण्यात आले. श्वान आर्या आणि मैना यांनी त्यांच्या पालकांनी दिलेल्या प्रत्येक आदेशाचे अगदी बिनचूक पालन केले. यात पालकांबरोबर परेड, स्वागत करणे, दबा धरून बसणे, वासावरून नेमकी वस्तू आणि व्यक्ती ओळखणे अशी अनेक कौशल्ये त्यांनी सादर केली.
पग श्वानाने लक्ष वेधून घेतले.

बातम्या आणखी आहेत...