आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Election And Fake Publicity Started At Aurangabad

स्वयंघोषित उमेदवारांमुळे संभ्रम, सोशल मीडियावर एमआयएम उमेदवारांच्या प्रचाराचे पोस्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगर पालिकानिवडणूक लढण्यासाठी इच्छुकांकडून अनेक क्लृप्त्या वापरण्यात येत आहेत. अनेकांनी तर आपल्याला एमआयएमकडून उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगत सोशल मीडियावरून प्रचार सुरू केला आहे, तर काहींनी आपापल्या वाॅर्डात बॅनर लावून मीच उमेदवार आहे म्हणून मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. या सर्व प्रकारांमुळे एमआयएममध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पक्षाने अद्याप कुणाचीही उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांवर वेळप्रसंगी कारवाई करण्यात येईल, असे एमआयएमने जाहीर केले आहे.

एमआयएमकडून उमेदवारी घेतल्यास हमखास निवडून येणार असा अाशावाद असलेली काही मंडळी तिकिटासाठी वशिलेबाजी करत आहेत. काहींनी तर सोशल मीडियावर स्वत:ची उमेदवारी जाहीर करून टाकली. तसे पोस्टही जोरात फिरत आहेत, तर स्वयंघोषित उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी तसेच मतदारांच्या घरी जाऊन मीच एमआयएमचा उमेदवार आहे, असा प्रचार सुरू केला आहे. या सर्व प्रकारामुळे एमआयएमचे स्थानिक नेते अवाक् झाले आहेत.

मलाही आश्चर्य वाटले
स्वयंघोषितउमेदवारांचे सोशल मीडियावरील प्रकार बघून मलाही आश्चर्य वाटले. पक्षाने अद्याप कोणलाही ितकीट दिले नाही. याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये. त्याबाबत हैदराबादची कमिटी निर्णय घेईल. आ.इम्तियाज जलील

ओवेसी बंधूंसह झळकताहेत उमेदवारांचे पोस्ट
काही स्वयंघोषित उमेदवारांनी स्वत:चा आणि ओवेसी बंधूचा फोटो असलेले बॅनर लावून प्रचाराला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट झळकताना दिसत आहे. त्याला काही जण लाइक करत आहेत, तर काही लोकांकडून थट्टा उडवण्यात येत आहे. स्वयंघोषित उमेदवारांनी असे प्रकार केल्यामुळे पक्ष त्यांच्याबाबत कडक पावले उचलणार आहे. सध्यातरी तिकीट वाटपापूर्वीच एमआयएममध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.