आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आप' मनपा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार, पदाधिका-यांची तयारी सुरू, लवकरच बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक, महाप्रचंड विजयामुळे औरंगाबादेतील आपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी महापालिकेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचे ठरवले आहे. शिवसेना-भाजपच्या भ्रष्ट कारभाराला तडाखा देऊन पायउतार करण्यासाठी आप मोर्चेबांधणी करत आहे.
आपची स्थापना झाल्यावर औरंगाबादेत या पक्षाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. मात्र, केजरीवालांनी ४९ दिवसांनंतर सत्ता सोडली. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर झाला. लोकसभा निवडणुकीत यश मिळाले नाही. ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका लढवायच्या नाहीत, असा उच्च पातळीवर निर्णय झाल्याने आपचे इच्छुक नाराज झाले होते. तरीही त्यांनी चिकाटी सोडली नाही. आंदोलनाच्या निमित्ताने ते रस्त्यावरच राहिले. त्यांच्यात भविष्यातील निवडणुकांचे काय, असा प्रश्न चर्चेस होता.
आज दिल्लीचे निकाल जाहीर झाले. आपला अभूतपूर्व यश मिळाले. त्यामुळे या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड वाढला आहे. त्यांनी तातडीने औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, आमच्याकडे उमेदवारांची मुळीच कमतरता नाही. शिवसेना-भाजपने २५ वर्षे सत्ता उपभोगून केवळ खड्डे दिले आहेत, याची जाणीव लोकांना आहे. त्यामुळे त्यांना सत्तेतून खाली खेचले पाहिजे, अशी लोकभावना आहेच. फक्त त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी हा समर्थ पर्याय वाटत नाही. दिल्लीतील निकालाने एक भक्कम पक्ष लोकांसमोर उभा ठाकला आहे. याचा फायदा घेण्याची आम्ही तयारी सुरू केली आहे. या पदाधिका-याने असेही सांगितले की, २०, २१ फेब्रुवारीला मुंबईत प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे. त्यात औरंगाबाद आणि नवी मुंबईच्या निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतानुसार हा प्रस्ताव बहुमताने मंजूर होणार आहे. औरंगाबाद निवडणुकीची तयारी आम्ही आधीच केली असून एक चाचपणीही पूर्ण झाली आहेे. उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना रिंगणात उतरवले जाणार आहे.
मोठे बळ मिळाले
दिल्लीच्या निकालाने आपला मोठे बळ मिळाले आहे. आता आम्ही पूर्ण ताकदीने औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लढण्यासाठी प्रदेश कार्यकारिणी पुढे प्रस्ताव ठेवणार आहोत. अण्णासाहेब खंदारे, ज्येष्ठ नेते, आप
आप बदल घडवणार
होय. आम्ही निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. औरंगाबाद शहरात ‘आप’च बदल घडवणार आहे. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
मनीषा चौधरी, जिल्हा समन्वयक
आम्ही सज्ज आहोत
महापालिकेतील भ्रष्ट कारभार मोडीत काढून लोकांच्या हिताची कामे फक्त आप करू शकतो. त्यामुळे ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू झाली आहे.
देवीदास कीर्तिशाही, ज्येष्ठ कार्यकर्ते