आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला महापालिका निवडणुकीची घाई नाही, वॉर्ड आरक्षणानंतर फेब्रुवारीपासून तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महानगरपालिका निवडणुकीसाठी युती करायची की नाही, यावर शिवसेना आणि भाजपमध्ये खल सुरू असला तरी काँग्रेसमध्ये अजून सर्वकाही आलबेल आहे. आधी वॉर्ड रचना अन् आरक्षण निश्चित होऊ द्या, त्यानंतर बघू. थोडक्यात फेब्रुवारीच्या मध्यानंतरच आम्ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाला लागू, असे आमदार सुभाष झांबड यांनी म्हटले आहे.
केंद्राबरोबरच राज्यातही पतन झाल्यानंतर येथे तसे होऊ नये यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये युती व्हावी, अशी चर्चा आधीपासूनच सुरू आहे; परंतु काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीनेही अजून यावर निर्णय घेण्याचे टाळले आहे. मात्र, आघाडी होऊ शकते, असे संकेत पूर्वीच दोन्हीही पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. काँग्रेसने तर अजून काहीही ठरवलेले नाही. कारण या निवडणुकीची जबाबदारी कोणावर दिली जाईल, हे अजून स्पष्ट झालेले नाही. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, अजून अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालेले नाही. एखाद्याकडे जबाबदारी दिल्यास पक्षात राजकीय हालचालींना वेग येणार हे नक्की आहे.
या महिन्याच्या शेवटी वाॅर्ड रचना व फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत वाॅर्ड आरक्षणही नक्की होईल. त्यानंतर वेगात निर्णय घेतले जातील, असे काँग्रेसकडून झांबड यांनी सांगितले. या वेळी आम्ही पालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आघाडी करण्याकडे आमचा कल राहील. अर्थात, दोन्ही बाजूंनी चर्चा झाल्यानंतरच निर्णय होणार आहे आणि त्यासाठी अजून अवधी असल्याचे ते म्हणाले.