आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा पराभवानंतर चार जणांना पुन्हा मनपाचे वेध, वॉर्ड आरक्षित झाला असला तरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नगरसेवक झाल्यानंतर सर्वांनाच पुढे आमदारकीची स्वप्ने पडतात. काहींची स्वप्नपूर्तीही होते. मात्र, आमदारकीचे स्वप्न भंगल्यानंतर पुन्हा महानगरपालिका निवडणूक लढून नगरसेवक होण्याचे प्रमाण शहरात मोठे आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चार नगरसेवकांनी पुन्हा नगरसेवक होण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
पूर्वमधून शिवसेनेच्या तिकिटावर लढलेल्या महापौर कला ओझा, पश्चिममधून भाजपकडून लढलेले मधुकर सावंत, याच मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लढलेले मिलिंद दाभाडे, मध्यमधून अपक्ष लढलेले अफसर खान ही मंडळी पुन्हा महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. महापौर ओझा यांचा विद्यानगर वाॅर्ड सर्वसामान्यांसाठी खुला आहे. त्यामुळे त्या याच वॉर्डातून लढू शकतात. मधुकर सावंत यांचा वाॅर्ड ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाला असून ते दुसऱ्या वाॅर्डाच्या शोधात आहेत. काशीनाथ कोकाटेंचाही वाॅर्ड आरक्षित झाल्याने तेही नव्या वाॅर्डाच्या शोधात आहेत. कोकाटे तीन वेळा तीन वेगवेगळ्या वाॅर्डांतून विजयी झाले होते. त्यामुळे त्यांना नवा वाॅर्ड शोधण्यात अडचण येणार नाही. अफसर खान हेदेखील तीन वेळा तीन वेगवेगळ्या वाॅर्डांतून विजयी झाले होते. त्यामुळे त्यांचा वाॅर्ड आरक्षित झाला असला तरी ते नव्या वाॅर्डाच्या शोधात आहेत.

इतिहासाची पुनरावृत्ती
या आधी देखील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्या नंतर महानगर पालिका लढलेले माजी महापौर गजानन बारवाल, विकास जैन, माजी सभापती काशीनाथ कोकाटे, माजी मंत्री गंगाधर गाडे, मनमोहनसिंग ओबेराॅय, मुजीब आलम शहा खान, इकबालसिंग गिल, डॉ. दत्ता पाथ्रीकर, गौतम खरात, सलीम मैदावाला, रतनकुमार पंडागळे यांचा समावेश आहे.

नगरसेवक न होता आमदार झाले
अतुल सावे यांनी 2005 ची महानगरपालिका निवडणूक लढवली होती; परंतु त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते पूर्वमधून आमदार झाले. त्यांचे वडील दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांच्याप्रमाणेच राजेंद्र दर्डा हे औरंगाबादेत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यांनी पालिका निवडणूक लढवली नाही. मध्यमधून निवडून आलेले पत्रकार इम्तियाज जलील हे अवघ्या वीसच दिवसांत आमदार झाले. पत्रकारिता सोडून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला अन् थेट आमदार झाले. त्यांची ही पहिलीच निवडणूक होती.