आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओपन वॉर्डांवर मातब्बरांचा जोर, ऋषिकेश खैरे समर्थनगरातून लढण्याच्या तयारीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पालिकेतील नामी गिरामी नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाल्याने ही मंडळी पाच वर्षे पालिका राजकारणातून दूर राहतील, असे सर्वांनाच वाटत होते. या मातब्बरांचे काय होणार, असा प्रश्नही काहींना पडला होता. त्याचे उत्तर याच मंडळींनी आरक्षण सोडतीच्या तिसऱ्याच दिवशी औरंगाबादकरांना दिले आहे. खुल्या (ओपन) वाॅर्डातून लढण्यासाठी ही मंडळी तत्पर झाली असून यातील काहींनी लगेच फील्डिंगही लावली आहे.
समर्थनगर हा उच्चभ्रूंचा वाॅर्ड या वेळी अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषिकेश येथून लढण्याच्या तयारीला लागले आहेत. गतवेळी ते एससी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या कांचनवाडी-नक्षत्रवाडी प्रभातून रावसाहेब गायकवाड यांच्याकडून पराभूत झाले होते. शहर प्रगती आघाडीचे विद्यमान नगरसेवक तसेच खा. खैरे यांचे मित्र समीर राजूरकर यांचा वाॅर्ड आरक्षित झाल्याने ऋषिकेश यांना हर्षवायू झाल्याचे त्यांचे निकटचे स्नेही सांगतात. मी अजून काही ठरवले नाही, असे ऋषिकेश यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले असले तरी त्यांनी मतदार याद्या मागवण्यापासून सर्व तयारी गेल्या दोन दिवसांत केली आहे. दरम्यान, गुलमंडी हा वॉर्ड सर्वांसाठी खुला असल्याने येथून कोण लढणार यावर सध्या पैजा लागत आहेत. खैरेपुत्र ऋषिकेश लढणार की खैरे हे पुतण्या सचिन याला संधी देणार याची चर्चा आहे. खासदारपुत्र येथून लढणार असेल तर माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषिकेशही तयारीत असल्याचे समजते. जैस्वाल, खैरे यांची मुले मैदानात येणार असतील तर माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनीही दुसरी पिढी मैदानात आणण्याचे संकेत दिले आहेत.
वैद्य, देसरडांची चाचपणी सुरू-
वैद्य यांचा वॉर्ड ओबीसी महिला, तर देसरडा यांचा वाॅर्ड सर्वसाधारण महिला असा आरक्षित झाला आहे. देसरडा यांच्या सौभाग्यवती सुराणानगर येथून लढतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. पत्नी निवडणूक लढवणार असली तरी स्वत: महानगरपालिकेत असावे म्हणून देसरडा विद्यानगरमधून लढणार आहेत. दुसरीकडे वैद्य यांचा वाॅर्ड आरक्षित झाल्यानंतर त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आगामी महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असल्याने त्यांनी लढावेच, असा आग्रह कार्यकर्ते तसेच त्यांच्या वरिष्ठांनी धरल्यामुळे ते विद्यानगरमधून लढणार असल्याचे समजते.

महापौरांच्या वॉर्डावर उड्या
महापौर कला ओझा यांचा विद्यानगर हा वॉर्ड सर्वांसाठी खुला आहे. त्यामुळे त्याच येथून लढतील, अशी चर्चा होती. मात्र, स्वत: ओझा यांनी खुल्या वाॅर्डातून लढण्याचा इन्कार केला आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या अन्य वाॅर्डातून लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या वाॅर्डातून लढण्यासाठी स्थायी समितीचे माजी सभापती राजू वैद्य हे सेनेकडून, तर माजी उपमहापौर प्रशांत देसरडा हे भाजपकडून प्रयत्नशील आहेत. वैद्य यांना पक्षश्रेष्ठींनी तसे संकेत दिले आहेत. दुसरीकडे देसरडा यांनी युती झाली तरी अन् नाही झाली तरी येथूनच लढणार हे स्पष्ट केले आहे.

खा. खैरेंच्या यादीची प्रतीक्षा
वॉर्ड आरक्षित झाल्यानंतर कोणाला कोठून लढवायचे, याची एक यादी खैरे यांच्याकडे तयार असते. गेल्या तीन दिवसांत त्यांनी यावर अजून भाष्य केलेले नसले तरी ते त्यांची यादी कधी जाहीर करतात अन् त्यात कोणाला स्थान मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांच्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या वाॅर्डात व्यापारी प्रफुल्ल मालाणी यांच्या पत्नीला तिकीट देण्याचे त्यांनी ठरवले आहे. रविवारी त्यांनी एका नगरसेवकाशी बोलताना याची वाच्यता केली.

दोन मित्र आमने-सामने
उपमहापौर संजय जोशी तसेच माजी सभागृहनेते सुशील खेडकर या मित्रांचे वाॅर्ड अनुक्रमे ओबीसी महिला तसेच एससी प्रवर्गासाठी आरक्षित झाले. या दोघांनाही शिवाजीनगरात नव्याने झालेला अन् सर्वांसाठी खुला असलेला वाॅर्ड खुणावतो आहे. दोघांनीही याच वाॅर्डातून लढण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेना व भाजपची युती झाली नाही तर हे दोघे मित्र एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकू शकतात. एकमेकांचे कच्चे दुवे हेरून दोघेही कामाला लागले आहेत.