आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत आपचा चमत्कारच पण शहरात डाळ शिजणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- देशभर विजयाची पताका फडकावणा-या भारतीय जनता पक्षाला दिल्लीत आम आदमी पार्टीने धूळ चारल्याचे वृत्त वाहिन्यांवर झळकले अन् शहरात आपच्या कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष सर्वांनाच दिसला. पण त्याहीपेक्षा मित्रपक्ष शिवसेना तसेच भाजपच्याही कार्यकर्त्यांनी खासगीत बोलताना आनंद व्यक्त केला. लोकसभेत विजय मिळवल्याने आमचेही अतिच झाले होते, अशी प्रतिक्रिया काहींना दिली. तर व्वा, छान झाले, आता महानगरपालिकेत युती होईल, असेही काहींनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर 49 व्या दिवशी राजीनामा फेकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना पुन्हा दिल्लीकर स्वीकारणार नाही, असे चित्र भाजपने निर्माण केले होते. त्यामुळे दीड वर्षांपूर्वीचेच चित्र पुन्हा दिसू शकते, अशी अनेकांची अटकळ होती. वेगवेगळ्या सर्वेक्षणात ‘आप’ला बहुमत मिळेल, असे सांगण्यात येत होते. परंतु हा आकडा एकदम 70 पैकी 67 इतका असेल, यावर ‘आप’च्याही कार्यकर्त्यांचा विश्वास नव्हता. सकाळी पहिल्या फेरीच्या निकालापासूनच ‘आप’ने आघाडी घेतल्याचे वृत्त झळकू लागले अन् शेवटपर्यंत ही आघाडी वाढतच गेली. या काळात स्थानिक पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात होते. अविश्वसनीय, चमत्कारच अशा प्रतिक्रिया समोर येत होत्या. असे असले तरी दिल्लीत चमत्कार घडवणारा आम आदमी पक्ष हा औरंगाबाद महानगरपालिकेत करामत करू शकेल, यावर मात्र ‘आप’सह अन्य पक्षांच्या नेत्यांचा अजूनही विश्वास नाही.
व्वा, छान झाले...
दिल्लीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतरची शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. भाजप हरला बरे झाले, आता ते मनपात युती करतील. विधानसभेत त्यांनी युती न करण्याचे कारण हेच होते. आम्हीच सर्वव्यापी. मात्र आता भाजपला कळाले. त्यामुळे ते मित्रपक्षाच्या ताकदीचा आदर करतील, असे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले तर होय, आमच्याकडून जरा अतिच झाले, अशी प्रतिक्रिया भाजपच्या स्थानिक नेत्यांनी खासगीत बोलताना दिली.
लोकसभेत बेतातीच मते :
लोकसभेत सुभाष लोमटे ‘आप’कडून लढले होते. मात्र ते कसेबसे ४ हजारांपर्यंत पोहोचू शकले. त्यामुळे दिल्लीत आकर्षण असलेल्या या पक्षाचे येथे अस्तित्व नसल्याचे समोर आले. असे असले तरी पालिकेत हा पक्ष किमान ४-२ जागा जिंकू शकेल, असे भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना वाटते. स्वत: लोमटे यांनी संघटना मजबूत केल्याशिवाय हाती काही पडणार नाही, असे म्हटले आहे.
येथे शिवसेनाच आप : औरंगाबाद शहराची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता ‘आप’ जे दिल्लीत करते तेच शिवसेनेने गेल्या दोन अडीच दशकांपासून औरंगाबादेत केले असल्याचा दावा शहरप्रमुख राजू वैद्य यांनी केला आहे. दिल्लीतील गरजेनुसार तेथील नागरिकांनी मतदान केले. औरंगाबादेतील नागरिक त्यांच्या गरजेनुसार शिवसेनेला पसंती देतात. त्यामुळे येथे ‘आप’ला स्कोप नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, ‘आप’मुळे एमआयएमला काही फरक पडणार नाही, असे आमदार इम्तियाज जलील यांनी सांिगतले.

येथील प्रश्न वेगळे; "आप'ची आम्हाला भीती नाही
लोकांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत तर काय होते हे दिल्लीच्या निकालाने दाखवून दिले. आम आदमी पार्टीला मिळालेले यश हे भाजपचे अपयश आहे, यात शंका नाही. मात्र, औरंगाबादचा विचार करता येथे शिवसेनाच आम आदमी पार्टी आहे. त्यामुळे भीतीचे कारण नाही. राजू वैद्य, शहरप्रमुख, शिवसेना

भाजपने जनतेला जी खोटी आश्वासने दिली, त्यामुळेच मोदींचा अश्वमेध रोखण्यात केजरीवाल यांना यश आले. यापुढे मोदींचे असेच होईल. औरंगाबादमध्ये ‘आप’ला फारसा प्रतिसाद मिळेल, असे वाटत नाही. येथील राजकीय तसेच भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे.
विनोद पाटील, शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी
आपचा सर्वाधिक तोटा हा भाजपला आहे. औरंगाबादेत काँग्रेस, राष्ट्रवादीला याचा फटका बसणार नाही. काँग्रेसचे बॅडपॅच असल्याने अधिक बोलणे योग्य नाही.
डॉ. जफर खान, माजी विरोधी पक्षनेते (काँग्रेस).