आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निम्म्यांचे सक्तीने पक्षांतर, भाजपच्या तंबूत येण्यास अनुत्सुक होते अनेक जण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांचे 5 नगरसेवक व माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश सोहळा गुरुवारी मोठ्या धूमधडाक्यात सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात पार पडला.
शहरात भाजपची ताकद वाढत असल्याचे दाखवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला असला तरी आज या पक्षात दाखल झालेल्या निम्म्या जणांची पक्षांतराची इच्छा नव्हती. सोहळ्यात अनेकांचे चेहरे तेच सांगत होते. खासगीत बोलताना या मंडळींनी तशी कबुली दिली. मात्र पक्षात येण्यासाठी हे सर्वजण आसुरलेले होते. प्रदेशाध्यक्षांना वेळ मिळाल्यानंतर हा सोहळा झाल्याचा दावा प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी केला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच भारिप बहुजन महासंघ व अपक्षांनी भाजपमध्ये येण्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर तयारी चालवली होती. देशात मोदींची लाट असल्याने जिंकायचे असेल तर भाजपकडूनच लढले पाहिजे, असा एक मतप्रवाह तयार झाल्याने अनेकांनी तशी फील्डिंग लावली होती. मात्र यातील अनेक चाणाक्षांनी वाॅर्ड आरक्षण झाल्यानंतर जाहीरपणे येतो, असे स्पष्ट केले होते. गेल्या आठवड्यात वॉर्ड आरक्षण झाल्यानंतर दामोदर शिंदे वगळता अन्य इच्छुकांनी भाजपमध्ये जाण्याचे थांबवले. कारण या सर्वांचे वॉर्ड आरक्षित झाले होते. आरक्षणानंतर भाजपमध्ये जाण्याचा फायदा तो काय? :भाजपकडून लढल्यानंतर जिंकणे सोपे जाईल म्हणून ही मंडळी भाजपमध्ये डेरेदाखल होणार होती. मात्र वॉर्डच आरक्षित झाला, आता निवडणूकच लढायची नाही, तेव्हा भाजपमध्ये कशासाठी जायचे, असे अनेकांचे मत होते. त्यामुळेच या मंडळींनी भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला होता.
दिल्लीच्या पराभवानंतर सोहळ्याची तयारी :
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम म्हणून औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत युती व्हावी, अशी अपेक्षा भाजपचेच कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. या परिस्थितीत भाजप अजूनही मोठाच पक्ष आहे, या पक्षात येणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही, हे दाखवण्यासाठी बुधवारी दुपारी हा सोहळा घेण्याचे नक्की झाले. मात्र पक्षात येण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी दुसऱ्या आरक्षण सोडतीपर्यंत थांबा, अशी विनंती केली. अवघे तिघेच भाजपमध्ये येण्यास इच्छुक होते. त्यातील एकाने तर दोनच दिवसांपूर्वी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला होता. मात्र इतरांनी नकार दिल्याने प्रदेशाध्यक्षांसमोर मोठा पेच निर्माण झाला. आरक्षण सोडतीनंतर वाॅर्ड मोकळे झाले तर नंतर प्रवेश दिला जाणार नाही, पक्षात यायचे असेल तर आत्ताच या, अन्यथा दरवाजा बंद, अशी तंबी देण्यात आल्यानंतर ही मंडळी भाजपमध्ये दाखल झाली असली तरी त्यांचे चेहरे सर्वकाही सांगत होते.
सेनेला शह देण्याचा प्रयत्न
दिल्लीच्या पराभवावर उद्धव ठाकरे यांनी जहरी टीका केली. महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा पक्ष आहे, हे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. अशा वेळा भाजपचे आकर्षण कायम असल्याचे दाखवण्यासाठी दानवे यांनी हा सोहळा घडवून सेनेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी खासगीत बोलताना सांगितले. हा सोहळा व्हावा अशी दानवे यांचीच इच्छा होती, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

कशासाठी हा खटाटोप
आम्ही अजूनही लाटेवर स्वार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न प्रदेश तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आहे. दिल्लीचा पराभव विसरण्यासाठी हाच मार्ग असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच इच्छुक नसणाऱ्या आजी-माजी नगरसेवकांना पक्षात घेण्यात आले असून त्यांना महानगरपालिकेची उमेदवारी मिळेलच, याची शाश्वती कोणीही देत नाही, या आयात झालेल्यांनाही तसे आश्वासन देण्यात आले नाही.
निष्ठावंत नाराज
आयत्या उमेदवारांना पक्षात घेण्यात येणार असल्याचे समजल्यापासून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. मोदी लाटेवर विजय मिळत असेल तर पक्षसेवा करणाऱ्यांनाच उमेदवारी द्या, अशी मागणी अनेकांनी केली होती. फक्त दाखवण्यासाठी बाहेरच्यांना उमेदवारी देण्यात आल्याने जुने कार्यकर्ते नाराज असून काहींनी लेखी पत्र श्रेष्ठींना दिले आहे. यातील दोघे सोमवारी प्रसिद्धिमाध्यमांसमोर येणार आहेत.

जिंकण्यासाठीच आलो
माझ्या वाॅर्डात लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाले. त्यामुळे येथून जिंकायचे असेल तर भाजपमध्येच गेलेले बरे म्हणून मी निर्णय घेतला होता. परंतु वाॅर्ड आरक्षित झाल्याने मी थांबलो होतो. मात्र आता आले नाही तर नंतर नाही, असे सांगण्यात आले. माझा पक्ष पाठीशी नाही, तेव्हा भाजपच नसेल तर जिंकणे अशक्य आहे, त्यामुळे भाजपमध्ये जाणे भाग पडले.

दोन महिन्यांची प्रतीक्षा होती
5 नगरसेवक तसेच अन्य पदाधिकारी हे लोकसभा निवडणुकीनंतरच पक्षात येण्यास इच्छुक होते. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्याकडून सातत्याने विचारणा होत होती. परंतु प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना वेळ नसल्यामुळे हा कार्यक्रम लांबला. आता रावसाहेब दानवे हे उपलब्ध झाल्याने हा सोहळा झाला. अनेक जण अजूनही इच्छुक आहेत. ते लवकरच भाजपमध्ये येतील. शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप