आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभागांचा निर्णय अधिवेशनानंतर, भाजप कार्यकर्त्यांचा प्रभाग पद्धतीला विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका प्रभागनिहाय की वॉर्डनिहाय, याचा निर्णय अधिवेशनानंतर घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त शनिवारी शहरात आले होते. महापालिकेने प्रभागनिहाय निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. आठ दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या पद्धतीने निवडणुका झाल्या तर पक्षाच्या हिताच्या राहणार नाहीत. शिवाय कामाचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात शहराच्या विकासाला खीळ बसेल. त्यामुळे जुन्या वॉर्ड पद्धतीनेच निवडणुका घेण्यात याव्यात, अशा आशयाचे निवेदन शहराध्यक्ष बापू घडामोडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. या वेळी आमदार अतुल सावे, शिरीष बोराळकर, डॉ. भागवत कराड यांनीही मुख्यमंत्र्यांकडे वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेण्याचा आग्रह धरला. तसेच शहराच्या रस्त्यांचा, महापालिका रुग्णालयातील दीडशे खाटांचाही प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे, त्यावर आपण निर्णय घ्यावा, अशी विनंती डॉ. कराड यांनी केली.
मुख्यमंत्री पहिल्यांदाच शहरात येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते चिकलठाणा विमानतळावर मोठ्या प्रमाणात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, प्रशांत बंब, नारायण कुचे, उपमहापौर संजय जोशी, प्रशांत देसरडा, संजय केणेकर तसेच उद्योजक राम भोगले, मुनीश शर्मा यांची उपस्थिती होती. तर प्रशासनाकडून विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, महापालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम उपस्थित होते.
कार्यकर्त्यांची बेशिस्त
मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर आगमन होणार म्हणून शेकडो कार्यकर्ते तीन वाजेपासूनच स्वागतासाठी सज्ज होते. मुख्यमंत्री विमानतळातून बाहेर पडताच त्यांना भेटण्यासाठी व त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांची चढाओढ लागली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत असतानाही कार्यकर्ते ओरडत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना बाजूला केले. शेवटी मुख्यमंत्र्यांना शांततेचे आवाहन करावे लागले.