आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्रेकरांनी हाकललेले ठेकेदार पुन्हा परतणार, डासनाशक फवारणीचे काम कंत्राटी पद्धतीने देण्याचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डास निर्मूलनासाठी औषधी फवारणीचे काम थातूरमातूर स्वरूपात करणाऱ्या ठेकेदारांना तत्कालीन मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हद्दपार केले होते. मात्र, आता डेंग्यू निर्मूलनासाठी याच ठेकेदारांना स्थायी समितीमार्गे पुन्हा मनपात पाचारण केले जाणार आहे. यासाठी शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे कारण पुढे करत स्थायी समितीकडूनच या ठेकेदारांसाठी पायघड्या अंथरल्या जात आहेत.
स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. यात नगरसेवक राज वानखेडे, सीताराम सुरे, नितीन चित्ते, कैलास गायकवाड, कीर्ती शिंदे यांनी औषध फवारणीचा मुद्दा उपस्थित केला. पावसाळ्यात रोगप्रतिबंधासाठी काय नियोजन केले, याचीही माहिती सदस्यांनी घेतली. तेव्हा आरोग्य विभागाने १०० फवारणी यंत्रे खरेदी केल्याचे उत्तर आरोग्य अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी दिले. तसेच कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर देऊन ते मोकळे झाले. त्यानंतर मात्र त्यांच्यावर सर्वच नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती करत शहरात कुठेच फवारणी सुरू नसल्याचे स्पष्ट केले. वानखेडे यांनी तर किती दिवस नियोजन करणार आहात, असा जाब विचारून मयूर पार्क, एन-११ परिसरात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण असूनही तेथे फवारणी नाही. रुग्ण दगावण्याची वाट बघता काय? असे म्हणत आरोग्य विभागाला धारेवर धरले.

सभापतींनी केला ठेकेदारांचा मार्ग मोकळा : नगरसेवकांच्याप्रश्नांवर डॉ. जगताप यांना कोणतेच उत्तर देता आले नाही. शेवटी मेघावाले यांनी आठ दिवसांत सर्व अहवाल सादर करून ठेकेदारांकडून औषध फवारणीचे काम करून घेण्याचे आदेश दिले. त्यांच्या सुरात सर्वच स्थायी सदस्य नगरसेवकांनी सूर मिळवला. मेघावाले यांच्या या आदेशामुळे ठेकेदारांच्या मनपा प्रवेशाचा जणू मार्गच मोकळा झाल्याचे चित्र दिसत आहे.

केंद्रेकरांनी केली होती बचत : डबघाईलाआलेल्या महानगरपालिकेचे कोटी रुपये दरवर्षी धूर फवारणी आणि अॅबेट औषध टाकण्याच्या कामासाठी ठेकेदारांच्या झोळीत घालण्यात येत होते.

फवारणीसाठी मनपाकडे ८६ कर्मचारी
आरोग्य विभागाकडे फवारणीसाठी ८६ कर्मचारी आणि १०० यंत्रे उपलब्ध आहेत. त्यानंतरही ठेकेदारांकडून काम करून घेण्याचे आदेश सभापती मेघावाले यांनी दिले, याबद्दल काही नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले. सध्या सहा झोनमध्ये साथरोग नियंत्रणासाठी कक्ष स्थापन करण्यात आले. रॅपिड अॅक्शन पथकही तयार करण्यात आले. दोन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे साथरोग नियंत्रण पथक तयार करण्यात आले. महिनाभर डेंग्यू नियंत्रण मोहीम सुरू राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...