आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक कोंडीत सापडलेल्या मनपाची कसोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लेखानुदान नाही आणि बजेटही नाही अशा बिकट आर्थिक संकटात सापडलेल्या मनपात आता सोमवारपासून अत्यावश्यक खर्चालाही कात्री लावावी लागणार असल्याने येत्या आठवड्यात तेही तीन दिवसांत अर्थसंकल्प आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे एलबीटी बंद झाली असली तरी थकबाकीदारांकडून वसुलीसाठी मनपाने मोहीम हाती घेण्याची तयारी चालवली आहे.

चहुबाजूंनी आर्थिक कोंडीत सापडलेल्या मनपाचा सोमवारपासून सुरू होणारा आठवडा कसोटीचा असणार आहे. मनपाचे लेखानुदान ३१ जुलैला संपले, तर अर्थसंकल्प अद्याप सादर केल्याने महापालिकेला अर्थसंकल्प सादर होईपर्यंत एक रुपयाही खर्च करता येणार नाही. तोपर्यंतच्या काळात अत्यावश्यक तातडीचा खर्च करण्याची वेळ आल्यास मनपाचे पुरते धिंडवडे निघणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार अथवा गुरुवारी अर्थसंकल्प सादर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे एलबीटी रद्द करण्यात आल्याने महापालिका हतबल झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत करवसुली वाढवण्याचे प्रयत्न करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. एलबीटी बंद झाली असली तरी शहरातील अनेक व्यापाऱ्यांकडे थकबाकी आहे. त्यावर आता मनपा लक्ष केंद्रित करणार आहे. मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी सांगितले की, एलबीटी बंद झाली असली तरी आम्ही मागील थकबाकी वसूल करणारच आहोत. त्यासाठी थकबाकीदारांची यादी तयार केली असून सोमवारपासून ती मोहीम हाती घेतली जाईल. दुसरीकडे व्यापारी महासंघानेही याबाबतीत मनपाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे थकबाकी असेल त्यांनी ती तत्काळ जमा करावी, असे आवाहन त्यांनी व्यापाऱ्यांना केले आहे.