आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Health Service Sub Center Closed Due To The District Administration

आरोग्य सेवा कोलमडली, नगरपरिषद झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे आरोग्य सेवा उपकेंद्र बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा आरोग्य उपकेंद्राची इमारत.
सातारा-देवळाई ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाले; परंतु स्थानिक समस्या मात्र सुटलेल्या नाहीत. साताऱ्यात जिल्हा प्रशासनाचे आरोग्य उपकेंद्र होते. रूपांतरणा अगोदर जिल्हा परिषदेमार्फत ते चालवले जायचे, पण आता ही जबाबदारी नगर परिषदेकडे आल्याने आरोग्य केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे परिसरातील गरजूंना याचा फटका बसत आहे.
पूर्वी ग्रामपंचायत जिल्हा आरोग्य विभागातर्फे उपकेंद्र चालवले जात होते. यासाठी बँकेमध्ये एक संयुक्त खाते होते. उपकेंद्रासाठी दर महिन्याला दहा हजार रुपये खात्यामध्ये जमा होत होते. उर्वरित कामांसाठी सरपंचाच्या परवानगीने निधी वाटप केले जात होते, पण नगर परिषद स्थापन झाल्यानंतर निधी वाटप करणे तसेच इतर काम करणे शक्य नसल्याने उपकेंद्र बंद केले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सातारा परिसरापासून महानगरपालिकेचे शंभूनगर राजनगर येथील केंद्र जवळ आहेत; परंतु तेथे गेल्यास साताऱ्यातील रहिवासी असल्याने गर्भवती महिला, इतर रुग्णांना तेथे उपचार देण्यास नकार दिले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली.
यासंदर्भात कचनेर येथील केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बोडके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नगर परिषदेला पत्र पाठवून उपकेंद्र बंद करत असल्याचे कळवले होते; परंतु त्यांनी यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलेले नाही. कायंदे म्हणाले, जिल्हा प्रशासन बेजबाबदारपणे वागत असून असे अचानक ते आरोग्य सेवा बंद कशी करतात. असा शासनाचा नियम असल्यास त्यांनी आम्हाला दाखवावा. प्रशासनाच्या या वादामुळे मात्र सामान्य नागरिक चांगलाच भरडला जात आहे.
महिला, नागरिकांना शासनाच्या भांडणाचे तोटे सहन करावे लागत आहे. यासंदर्भात नगर परिषदेने तत्काळ निर्णय घ्यावा, असे आशा शिराणे यांनी सांगितले, तर नगर परिषदेने हालचाल केल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश बाहुले यांनी म्हटले.

उपकेंद्राचे कार्य काय?
जिल्हाप्रशासनाच्या या आरोग्य उपकेंद्रामध्ये गर्भवती महिलांची नोंदणी करणे, लसीकरण करणे, रोगराई पसरल्यास परिसरामध्ये फवारणी करणे, तसेच जन्माला आलेल्या बाळाची पाच वर्षांपर्यंत लसीकरणासोबतच नोंदणी ठेवणे आदी कामे करण्यात येतात.
अडचण काय?
उपकेंद्रबंद झाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गर्भवती महिलांनी जायचे कुठे, असा प्रश्न गावातील नागरिक विचारत आहे. तसेच एमसीटीएस क्रमांकही मिळत नाही. उपकेंद्राची परवानगी असल्याशिवाय बाहेर सोनोग्राफी करण्याची परवानगी घेण्यास अडचण येत आहे. आरोग्य सेवा उपलब्ध करण्याची मागणी केली जात आहे.
नगर परिषदेला पत्र पाठवले
नगरपरिषदेने त्यांनी त्यांची आरोग्य सेवेसाठी स्वतंत्र सेवेची व्यवस्था करावी. आम्ही यापुढे पूर्वीचे आरोग्य सेवा उपकेंद्र सुरू ठेवत नाही यासंदर्भात नगर परिषदेला पत्रव्यवहार करून कळवले आहे.
-डॉ.बोडके.
सेवा बंद करणे चुकीचे
नगरपरिषदेकडे आधीच मनुष्यबळ निधीची कमतरता आहे. त्यात आम्ही आरोग्य सेवा कशी पुरवायची, हा मोठा प्रश्न आहे. जिल्हा प्रशासन असे अचानक सेवा बंद नाही करू शकत. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे.
- अशोक कायंदे, मुख्याधिकारी