आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नवजात बालकाच्या फूटप्रिंट, महापालिकेच्या प्रसूतिगृहांत सीसीटीव्ही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रसूतिगृहातून नवजात बालकांची पळवापळवी, अदलाबदली टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाच्या पाचपैकी तीन प्रसूतिगृहांतील वॉर्डांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित दोन रुग्णालयांतही लवकरच कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामुळे नवजात बालकांच्या फूटप्रिंट उपलब्ध होतील.
देशात विविध ठिकाणी सरकारी, नगरपालिका, मनपाच्या रुग्णालयांतून नवजात बाळांना पळवून नेण्याचे प्रकार घडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांत पळवापळवीचे प्रकार थांबवण्यासाठी सुरक्षा उपाय योजण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. औरंगाबाद महापालिकेने या निर्देशांचे पालन करत सिल्क मिल कॉलनी, सिडको एन -८, सिडको एन -११, कैसर कॉलनी, बन्सीलालनगर या पाच प्रसूतिगृहांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू केले. त्यापैकी तीन रुग्णालयांत चार कॅमेरे व
यंत्रणा बसवण्यात आली आहे. इतर दोन रुग्णालयांचे कामही सुरू आहे. मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी म्हणाल्या की, औरंगाबादेत असा पळवापळवीचा प्रकार घडला नसला, तरी निर्देशानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा २४ तास सुरू राहाणार असून त्यायोगे रुग्णालयातील बारीकसारीक हालचालींवर देखरेख करता येणार आहे.
बाळांच्या फूटप्रिंट घेणार
शहरातील या पाच प्रसूतिगृहांत वर्षाला ८०० बालके जन्माला येतात. या रुग्णालयांत बाळांच्या अदलाबदलीसारखे प्रकार घडू नयेत यासाठी गरोदर महिला व जन्माला येणाऱ्या बाळांची सविस्तर नोंद ठेवण्यात येणार आहे. तसेच नवजात बालकांचे फूटप्रिंट्स घेतले जाणार असून त्याची नोंद करून ठेवली जाणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचा ड्यूटी चार्टही दर्शनी भागात लावण्यात येणार असून त्यामुळे कोणत्या वेळी कोणता कर्मचारी कामावर होता याचीही नोंद उपलब्ध राहणार आहे.