आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन गणवेशाविना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा यंदाचा स्वातंत्र्यदिनही जुन्याच गणवेशांवर अथवा गणवेशाविना साजरा होणार आहे. मनपाने आता कुठे गणवेशासाठीच्या ३२ लाख ९५ हजार ६०० रुपये खर्चाचा प्रस्ताव आणला असून तो मंजूर झाल्यावर पुढच्या सगळ्या प्रक्रिया होणार असल्याने नवीन गणवेशांसाठी सप्टेंबरचा शेवटचा आठवडा कसाही करून उजाडणार आहे.
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच गणवेश पुस्तके मिळाल्याचे उदाहरण दुर्मिळच आहे. दरवर्षी शाळा सुरू झाल्यावर प्रशासन जागे होते या कामांच्या हालचाली सुरू होतात. यंदाही तसेच झाले आहे. शाळा सुरू होऊन आता दोन महिने होतील. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना आजपर्यंत नवीन गणवेश देण्यात आलेले नाहीत. स्वातंत्र्यदिन १२ दिवसांवर आला आहे. आता कुठे प्रशासनाने प्रस्तावाचे घोडे पुढे आणले आहे. गेल्या मंगळवारी तहकूब करण्यात आलेली स्थायी समितीची बैठक बुधवारी (५ आॅगस्ट) सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यात गणवेशाबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मनपाच्या ७६ शाळांतील बालवाडी ते दहावीपर्यंतच्या ८२३९ विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी ४०० रुपये दराने गणवेशासाठी ३२ लाख ९५ हजार ६०० रुपये निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर गणवेशांबाबतच्या हालचाली सुरू होतील. शालेय व्यवस्थापन समितीमार्फत मुख्याध्यापकांना विद्यार्थी संख्येनुसार धनादेश दिले जातील. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीने गणवेशाच्या कापडाचा पुरवठादार निवडणे, शिलाईसाठी ठेकेदार निवडणे आदी प्रक्रिया करायवाची आहे. निधीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या पुढील कार्यवाहीसाठी किमान एक महिना जास्तीत जास्त कितीही कालावधी लागू शकतो. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन जुन्याच गणवेशांवर साजरा करावा लागेल, असे दिसते.

बजेटची बैठक शुक्रवारी?
महापालिकेचे बजेट सादर करण्यासाठी येत्या शुक्रवारी स्थायी समितीची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. लेखानुदानाची मुदत ३१ जुलैला संपल्यानंतर आता बजेटही नसल्याने महापालिकेच्या खर्चावर आपोआप बंधने आली आहेत. अत्यावश्यक कामांसाठी कार्योत्तर मान्यतेचा तोडगा वापरण्यास पदाधिकाऱ्यांनीही मान्यता दिल्याने खर्चाची टांगती तलवार दूर झाली आहे.