आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक बांधकामावर हातोडा, मग धनदांडग्यांना मुभा का? नागरिकांचा प्रशासनाला सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत एमआयडीसी प्रशासनाने बजाजनगरातील मोकळ्या जागेवर उभारलेली धार्मिक स्थळे काढून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ केला खरा; मात्र धनदांडग्यांच्या अतिक्रमणांकडे डोळेझाक करण्यात आली. त्यांच्या अतिक्रमणांना कोणाचे अभय आहे. ही अतिक्रमणे सुरक्षित राहावीत म्हणून तर धार्मिक स्थळांवर हातोडा घालत भावनिक वातावरण तयार करण्यात आले नाही ना, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

वाळूज एमआयडीसीतील महिला विश्रांती कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी औद्योगिक परिसरातील अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढावीत, असा सल्ला देत त्यानंतर कारवाई सुरू करण्याचा इशारा दिला. यापाठोपाठ सप्टेंबर महिन्यात एमआयडीसी प्रशासनाने रहदारीला अडथळा ठरणाऱ्या लहान-मोठ्या अतिक्रमणावर हातोडा घालण्याचे काम पूर्ण केले.

त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार २८ ऑक्टोबर रोजी एमआयडीसीच्या जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळांवर प्रशासनाने हातोडा घातला होता. रहिवाशांच्या विरोधाला जुमानता कडेकोट बंदोबस्तात या कारवाईमुळे सामान्य नागरिकांसह भाविकांमध्ये राेष निर्माण झाला होता. शासकीय शुल्क तसेच दंड भरून बांधकाम नियमित करण्याची मागणी असताना हे बांधकाम काढल्यामुळे भाविक संतापले होते.

अनेकांनीस्वत: काढली अतिक्रमणे
वाळूजमहानगर तसेच बजाजनगर परिसरातील अनेक बेरोजगारांसह त्यांच्या कुटुंबीयांनी एमआयडीसीच्या मोकळ्या जागेवर हातगाडे, चहाची टपरी तसेच पत्र्याचे शेड उभारून उदरनिर्वाहासाठी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले होते. अनेक वर्षांपासून हे व्यावसायिक याच जागेत होते. मात्र, पोलिस आयुक्त तसेच एमआयडीसी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अतिक्रमण स्वत:च काढून त्यांनी प्रशासनाला मदत केली; परंतु व्यवसायावरच गंडांतर आल्यामुळे शेकडो कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या उपजीविकेचे काय हा प्रश्न अनुत्तरित आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे राजकीय वरदहस्त असणाऱ्या गर्भश्रीमंतांच्या अतिक्रमणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.

"त्या' भागात हातोडा कधी?
एमआयडीसी प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू केल्याने बजाजनगरातील धनदांडग्या अतिक्रमणधारकांनी धास्ती घेतली होती. मात्र, दरम्यानच्या काळात कारवाई थंडावल्यामुळे ही मोहीम फक्त लहानसहान टपरीधारक धार्मिक स्थळांपुरतीच मर्यादित होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धनदांडग्यांनी महाराणा प्रताप चौकासह एमआयडीसीच्या जागेवर बांधकाम करून गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत. अशा अतिक्रमणावर एमआयडीसी प्रशासन कधी हातोडा घालणार, अशी चर्चा सध्या होत आहे.

पुन्हा मोहीम राबवणार
एमआयडीसी प्रशासनाकडे अतिक्रमण काढण्यासाठी लागणारे पथक साहित्य नाही. महानगरपालिकेकडे पथकाची मागणी केली आहे, ते मिळाले की लगेच बजाजनगरात मार्किंग केल्यानुसार अतिक्रमणे काढली जातील. राजेंद्रगावडे, कार्यकारीअभियंता, एमआयडीसी