आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे 37 लाखांचे चेक गायब- उपायुक्तांकडे संशयाची सुई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-मनपाच्या लेखा विभागाने तयार केलेले 37 रुपयांचे सहा चेक गायब झाले असून त्याची ना लेखा विभागात नोंद आहे ना संबंधितांना ते दिले गेले आहेत. कामगार शक्ती संघटनेचे नेते गौतम खरात यांनी हे चेक उपायुक्त सुरेश पेडगावकर यांच्या ताब्यात असल्याचा आरोप केला असून पेडगावकरांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे.

15 डिसेंबर 2013 आणि नंतर 6 जानेवारी 2014 रोजी लेखा विभागाने हे चेक तयार केले. पुष्पनगरी भूखंड घोटाळ्यातून दोषमुक्त झाल्याने मनपाच्या सेवेत रुजू झालेल्यांना निलंबन काळातील तफावतीच्या रकमेचे हे चेक आहेत, तर धनादेश गर्भवती महिला पोषण आहार योजनेचा आहे. 187026, 18727, 187028, 186895, 187020 आणि 18597 क्रमांकांचे हे धनादेश आहेत. या सर्व धनादेशांवरील रकमेचा आकडा 37 लाख 70 हजार 38 रुपये एवढा आहे. हे सहा धनादेश लेखा विभागाने तयार केले, संबंधितांच्या स्वाक्षर्‍या झाल्या. पण नंतर हे चेक गायब झाले. कामगार शक्ती संघटनेचे गौतम खरात यांनी या संदर्भात एक पत्रकार परिषद घेत आरोप केला की, लेखा विभागाने तयार केलेल्या या चेकवर उपायुक्तांची स्वाक्षरी घेणे आवश्यक असते. त्यामुळे हे चेक सध्या उपायुक्त सुरेश पेडगावकर यांच्या ताब्यात आहेत. या चेकबाबत लेखा विभागात नोंद नाही आणि संबंधितांना दिले याचीही नोंद नाही. हे चेक गायब झाले की जाणूनबुजून दाबून ठेवण्यात आले याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले की, हा प्रकार अतिशय गंभीर असून त्यात शंका घ्यायला पुरेपूर वाव आहे. या संदर्भात उपायुक्त पेडगावकर म्हणाले की, असे कोणतेही चेक माझ्यापर्यंत आलेले नाहीत. त्यामुळे ते दाबून ठेवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.