आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षात शहर कचरामुक्त करण्याचा मनपाचा संकल्प, प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या शहराला शंभर टक्के कचरामुक्त करण्याचा संकल्प महानगरपालिकेने केला आहे. हा संकल्प नववर्षापासूनच अमलात आणण्याची मनपाने तयारी केली आहे. यासाठी शहरात काही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात शहर कचरामुक्त करण्यासाठी एक जानेवारीपासून "शून्य टक्के कचरा' ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
सिडकोचे कारभारी असताना मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वाळूज महानगरमध्ये कमी कर्मचारी, खर्च आणि नियोजनाने महानगर एक दोनमधील कचऱ्याची समस्या सोडवली आहे. तेेथे शंभरावर कचराकुंड्या वॉर्डातून बाद करण्यात आल्या. तसाच प्रयोग शहरातही राबवण्यासाठी नियोजन केले जात आहे. त्यासाठी मनपाच्या वॉर्ड अधिकाऱ्यांसह इतरही अधिकाऱ्यांना वाळूजला भेट देऊन प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच स्वच्छता निरीक्षकांनाही प्रशिक्षित करण्यात आले. लवकरच वॉर्डात सफाई करणारे कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर नववर्षाच्या सुरुवातीलाच शून्य टक्के कचरा मोहिमेला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी गेल्या दोन दिवसांत मनपाच्या सर्वच अधिकाऱ्यांना वाळूजच्या प्रकल्पात प्रत्यक्ष जाऊन माहिती देण्यात आली.

अशीहोणार सुरुवात
मनपाच्याकर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या पिशवी अथवा कचरा पेट्यांमध्ये टाकण्यास सांगितले जाणार आहे. हा कचरा जमा करण्यासाठी घंटागाडी आणि छोट्या गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यामुळे कुणालाच रस्त्यावर कचरा टाकण्यासाठी जावे लागणार नाही. कचरा जमा करण्यासाठी वॉर्डानुसार निश्चित वेळ ठरवून देण्यात येईल. जमा केलेला ओला सुका कचरा वॉर्डातील एका निश्चित ठिकाणी जमवून तेथे कचरा वेचकांकडून त्यांना आवश्यक कचरा घेऊ दिला जाईल. उर्वरित १० ते २० टक्केच कचरा नारेगाव अथवा इतर ठिकाणी विल्हेवाटीसाठी नेला जाईल. त्याचबरोबर ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी मोकळ्या भूखंडावर अथवा मनपाच्या जागेवर खत प्रकल्पही उभारला जाणार आहे. मनपावरीलभुर्दंड कमी होईल : शहरातीलकचरा नारेगावात नेण्यासाठी वाहनांना १५८ खेपा कराव्या लागतात. त्यासाठी कर्मचाऱ्यांची बडदास्त असते. मात्र, रस्त्यावर कचरा जाणार नसल्याने कचरा उचलणाऱ्या रस्ता साफ करणाऱ्यांची संख्या कमी होईल. या खर्चासह वाहनांच्या फेऱ्या कमी होणार असल्याने तोही खर्च कमी होणार आहे.

प्लास्टिकवरविशेष लक्ष : शहरातलहान-मोठ्या दुकानांसह सर्वच ठिकाणी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. अशा पिशव्या विकणाऱ्या ५० व्यापाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यांनीही शहर स्वच्छतेसाठी या पिशव्या विकणार नसल्याचे सांगितले. कारखानदाररांवरही पिशव्या तयार केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर काही वॉर्ड निवडणार
मनपाच्या क्षेत्रात ही मोहीम राबवण्यासाठी सुरुवातीला प्रत्येक प्रभागातून दोन वॉर्ड निवडून तेथे ही मोहीम राबवली जाणार आहे. येथील अडचणी लक्षात घेऊन शहरातील इतर भागातही मोहीम यशस्वी करण्यास अडचण येणार नाही.

रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाई
मोहीमराबवूनही नागरिकांकडून रस्त्यावर कचरा टाकला जात असेल तर त्यांना सुरुवातीला समजावून सांगितले जाईल. तरीही फरक पडल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वॉर्डावॉर्डांत लक्ष ठेवण्यासाठी सफाई कामगारांसह वॉर्डातील कर्मचारी, बचत गट आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

अधिकारी-पदाधिकारी अनुकूल
मनपाआयुक्तसुनील केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम शहरात सुरू होणार आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागासह सर्व अधिकारी -पदाधिकारी अनुकूल असल्याने ही मोहीम यशस्वी होईल. -शिवाजी झनझन, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख

१८ मनपातस्वच्छता निरीक्षक
१०० जवान
२५०० सफाईसहइतर कामांसाठी कर्मचारी
५०० टनकचरा किमान दररोज उचलण्यात येतो
१५८ खेपाकचरा उचलण्यासाठी मनपाच्या लहान-मोठ्या वाहनांकडून केल्या जातात.
बातम्या आणखी आहेत...