आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचे कॅफो भ्रष्टाचारी, आमदार जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी (कॅफो) हितेश विसपुते भ्रष्टाचारी असून त्यांची तातडीने बदली करावी, अशी तक्रार आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून तातडीने चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करा, असे आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्त विलास ढगे यांना दिले आहेत.

विसपुते यांच्या कारभाराबाबत नगरसेवक, पदाधिकारी ठेकेदारांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांची दखल घेत आमदार जगताप यांनी दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. विसपुते हे अार्थिक विषयांबाबत मनपाच्या विरोधात निर्णय घेऊन स्वत:चा अार्थिक लाभ करून घेतात. त्यांच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. मनपाच्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात अशा तक्रारी येणे ही गंभीर बाब आहे. विसपुते यांची तातडीने बदली करून त्यांच्या विराेधात कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले. विसपुते यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांना मिळाले आहेत. वित्त विभागाच्या लेखा कोषागार संचालनालयाचे सहसंचालक बी. बी. थिटे यांनीही विसपुते यांच्या भ्रष्टाचाराबाबत अहवाल मागवला आहे. दरम्यान, आयुक्त ढगे यांनी विसपुते यांच्या बदलीचा प्रस्ताव शासनाकडे आधीच पाठवला आहे. त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. नगरविकास विभागाच्या आदेशानुसार आयुक्त ढगे विसपुते यांच्या चौकशीसाठी कोणाची नियुक्ती करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनपाच्या महासभेतही काढले धिंडवडे
तत्कालिनमुख्य लेखा अधिकारी प्रदीप शेलार यांच्या बदलीनंतर मनपाला चांगला अधिकारी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु विसपुते यांनी या अपेक्षेवर पाणी फिरवले. अल्पावधीतच त्यांच्या विरोधात तक्रारींचा ओघ सुरू झाला. नुकत्याच झालेल्या महासभेत काही नगरसेवकांनी विसपुते यांच्या कारभाराचे अक्षरश: धिंडवडे काढले होते. नगरसेवकांनी केलेल्या एकाही आरोपाचे खंडण विसपुते यांना करता आले नाही. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच चौकशीचे आदेश दिल्याने विसपुते यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.