आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरक्षेत ८० टक्के पालिका शाळा ‘नापास’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात महापालिकेच्या १२८ शाळा असून त्या ८६ इमारतींमध्ये भरतात. महापालिकेच्या काही शाळा या एकवेळ तर काही शाळा दिवसभर सुरू असतात. मात्र, या शाळा सुटल्यानंतर याठिकाणी कुणीही शाळा वा त्यातील साहित्य सांभाळण्यासाठी, त्याची देखरेख ठेवण्यासाठी उपस्थित राहत नसल्याचे चित्र ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे.
महापालिकेने शिक्षण मंडळाला केवळ २० सुरक्षारक्षकच उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे केवळ २० शाळांचीच सुरक्षा सद्यस्थितीत होत असून, ६६ शाळांची सुरक्षा रामभरोसे आहे. या शाळामंध्ये सुरक्षारक्षक नसल्याने शालेय कामकाज अाटाेपल्यानंतर परिसरातील टवाळखोर तेथे ताबा मिळवतात. परिसरातील टवाळखोर मुले या शाळांच्या व्हरांड्यात पत्ते खेळतानाही अाढळून येतात. तर काही मुले उघड्यावर मद्यसेवन करतानाही दिसतात. काही ठिकाणी तर शाळा सुटल्यानंतर गुन्हेगार आपला अड्डाच स्थापन करतात. सुरक्षारक्षक नसल्याने अशा व्यक्तींचे अायतेच फावते. त्यामुळे शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांसह अाता या शाळाही असुरक्षित झाल्या आहेत.
दृष्टिक्षेपात असे...
महापालिका शाळांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन अाजही उदासीन असून, अाजघडीला ८६ पैकी तब्बल ६६ शाळा इमारतींना सुरक्षारक्षकच नसल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आली आहे. पालिका शिक्षण मंडळ विभागाकडे केवळ २० सुरक्षारक्षक असल्याने नवीन १५२ सुरक्षारक्षकांची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रस्तावाकडे दुर्लक्षच केले गेल्याने सद्यस्थितीत ताे फाइल्सच्या प्रवासात अडकून असल्याचे समजते. परिणामी, महापालिकेच्या शाळांची सुरक्षा रामभरोसे असून, काही शाळांची प्रचंड दुरवस्था झाली अाहे, तर काही शाळा टवाळखोरांच्या अड्डाच बनल्या असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे. त्यावर हा प्रकाशझोत...
८६ पैकी तब्बल ६६ महापालिका शाळांच्या इमारतींना सुरक्षारक्षकच नसल्याचे सुरक्षितता धाेक्यात; अनेक शाळांमध्ये पुरेशा उपाययाेजनांअभावी झाली प्रचंड दुरवस्था, काही शाळा बनल्या टवाळखाेरांचा अड्डा
वरिष्ठांना कळवले अाहे, लवकरच हाेईल निर्णय...
नितीनउपासनी, प्रशासनाधिकारी,मनपा शिक्षण विभाग, नाशिक
{महापालिकेच्या किती शाळा अाहे आणि किती इमारतींमध्ये सध्या शाळा भरतात?
- महापालिकेच्या१२८ शाळा असून, त्या ८६ इमारतीत भरतात.
{महापालिकेच्या किती शाळांना सध्या सुरक्षारक्षक आहेत?
- अाम्हीमहापालिकेच्या २० शाळांच्या इमारतींमध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे.
{मग, महापालिकेच्या अन्य ६६ शाळा इमारतींना सुरक्षारक्षक का नेमण्यात अालेले नाहीत?
- महापालिकेच्या६६ शाळांच्या इमारतींसाठी १५२ सुरक्षारक्षकांचा प्रस्ताव दिलेला आहे. लवकरच निर्णय हाेऊ शकताे.
{महापालिकेच्या शाळांना सुरक्षारक्षकच नसल्यामुळे या शाळांमध्ये टवाळखोरांचा अड्डा बनत चालला आहे, अनेक शाळांत चाेऱ्यांचे प्रमाण वाढले अाहे. साहित्याची दुरवस्था हाेत अाहे, त्याचे काय?
- महापालिकेच्याशालेय इमारतींत सुरक्षारक्षक नसल्यामुळे काही महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची घटना घडली हाेती. त्याबाबत वरिष्ठांना माहिती दिलेली आहे. टवाळखोर, तसेच चाेऱ्यांबाबतही वरिष्ठांपर्यंत माहिती पाेहाेचवली अाहे.

पोलिस ठाण्यांमध्ये नोंदीही नाहीत
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या, शाळा किती सत्रांत चालते, शाळा भरण्याची वेळ आणि शाळा सुटण्याची वेळ यांसारख्या अनेक गोष्टींची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदविण्याची सक्ती आहे. मात्र, शहरातील अनेक शाळांनी या स्वरूपाची कोणतीही नोंद पोलिस ठाण्यात केलेली नाही. अशा गोष्टींमुळे शाळांचीही उदासीनता अाता अधाेरेखित हाेऊ लागली अाहे.

प्रस्तावाला मिळेना प्रतिसाद
महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शाळांना सुरक्षारक्षक उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महापालिका शाळांच्या मुलांसह शाळाच टोळक्यांच्या हातात सापडल्या आहेत.

प्रशासन पुन्हा दुर्घटनेची वाट बघतेय का?
महापालिकांच्या इमारतींमध्ये शाळांच्या साहित्यासह महत्त्वाची कागदपत्रे असतात. सुरक्षारक्षक नसल्याने या साहित्यासह कागदपत्रे सांभाळणे शिक्षक तथा मुख्याध्यापकांना अवघड झाले आहे. त्याचबराेबर या इमारती रिकाम्या असल्याने या ठिकाणी अनुचित घटना घडण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. शाळेच्या इमारती रिकाम्या रहात असल्याने समाजकंटकांकडून या ठिकाणी गैरकृत्य घडू शकते. टवाळखाेरांचा वावर वाढल्याने सुरक्षितता धाेक्यात येते. असे असतानादेखील महापालिका प्रशासन गैरकृत्य घडण्याची वाट पहात आहे काय, असा संतप्त सवालही अनेक पालकांसह जागरूक नागरिकांनी उपस्थित केला आहे. एकूणच, या सर्व प्रकारामुळे पालिका प्रशासनाची सुरक्षिततेविषयीची उदासीनताच अधाेरेखित हाेत अाहे.

महत्त्वाच्या कागदपत्रांसह संपूर्ण रेकाॅर्ड चोरीला...
महापालिकेच्या अनेक शालेय इमारतींमध्ये सुरक्षारक्षकच नेमण्यात अाले नसल्यामुळे या शाळांत चोरीचे प्रकार वाढू लागले आहेत. आतापर्यंत पंचवटी, जुने नाशिक, सिडको भागातील महापालिकेच्या शाळांत मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडलेल्या असून, यात शाळेतील महत्त्वाची कागदपत्रे, साहित्य चोरीला गेल्याचीही उदाहरणे अाहेत. मुख्य म्हणजे, काही शाळांतून तर विद्यार्थ्यांचे संपूर्ण रेकॉर्डच चोरीला गेल्याची माहिती ‘डी. बी. स्टार’च्या तपासात समोर आली आहे. यावरून महापालिका शाळांच्या इमारतींमध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक तातडीने हाेणे किती गरजेचे अाहे, याची प्रचिती येते. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने निर्णय घेणे गरजेचे बनले अाहे.

शालेय सुरक्षा समित्या कागदावरच
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेमध्ये शालेय सुरक्षा समितीची स्थापना करणे हे बंधनकारक करण्यात अाले आहे. मात्र, आजतागायत शहरातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या शाळा वगळता अन्य कोणत्याही शाळांमध्ये ही समिती गठित करण्यात अालेली नसल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाली अाहे. विशेष म्हणजे, शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ज्या प्रशासनावर नेमण्यात अालेली आहे, त्याच शिक्षण मंडळाच्या शाळांमध्येदेखील पुरेसे सुरक्षारक्षक नेमण्यात अाले नसल्याची बाब ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे.

खासगी शाळांनीही घ्यावी काळजी
शहरात मॉल्सपासून राजकीय पक्षांच्या कार्यालयांपर्यंत सर्व ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला जाताे. मात्र, देशाचे भवितव्य घडविणाऱ्या शाळांच्या बाबतीत उदासीनताच अाहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना व्यवस्थापनाला सूचना देण्याची गरज का निर्माण व्हावी? यासाठी शाळा प्रशासन आणि संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढे येण्याची गरज आहे. पालकांनी याबाबत काही महत्त्वाच्या सूचनाही शालेय प्रशासनाकडे केल्या आहेत. यांत पालकांना गेट पास देणे, शाळेत येणाऱ्या व्यक्तींची वैयक्तिक माहिती पुराव्यांसह घेणे, अभ्यागतांच्या नोंदी करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. जेणेकरून सुरक्षा अबाधित राहू शकेल.

अनेक पालिकाशाळांवर टवाळखोरांनी घेतला ताबा
नाशिक महापालिकेच्या शाळांच्या सुरक्षेची स्थिती अाजघडीला अत्यंत दयनीय असून, महापालिकेच्या ८६ पैकी ६६ शालेय इमारतींना सुरक्षारक्षकच नेमण्यात अाले नसल्याचे चित्र आहे. शिक्षण मंडळाकडे केवळ २० सुरक्षारक्षकच असल्याने नवीन १५२ सुरक्षारक्षकांची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, ही मागणीही फाइल्समध्ये अडकली असल्याचे दिसून अाले अाहे. त्यामुळे शाळांची सुरक्षा आता रामभरोसेच असून, शाळा गुंड टवाळखोरांचा अड्डा बनत चालल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. परिणामी, अशा असुरक्षित शाळांमध्ये कागदपत्रे, साहित्य चाेरीस जाण्याचे प्रकारही घडत अाहेत.

१२८
महापालिकेच्याएकूण शाळा
८६
इमारतींमध्येभरतात शाळा
६६
इमारतींनाअद्याप सुरक्षारक्षकच नाहीत
१५२
सुरक्षारक्षकांचीसध्या गरज

प्रत्येक शाळांमध्ये सुरक्षारक्षक हवेच...
^विद्यार्थी,तसेचशालेय साहित्य, कागदपत्रे यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळांमध्ये सुरक्षारक्षक नेमणे गरजेचेच अाहे. प्रशासनाने लवकरात लवकर सर्व शाळांमध्ये सुरक्षारक्षक नेमण्याची गरज अाहे. -गाेपी पाटकरी, पालक
बातम्या आणखी आहेत...