आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिकारी येण्यापूर्वीच विहिरीची सफाई, दोन अभियंत्यांनी केली विहिरीची प्रत्यक्ष पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विहिरीतील पाण्यावर प्रकिया करताच ते सातारा गावातील गावकऱ्यांना पुरवले जात असल्याच्या वृत्ताची दखल घेऊन मनपाच्या दोन कनिष्ठ अभियंत्यांनी शनिवारी विहिरीची आणि तुटलेल्या पाइपलाइनची पाहणी केली आणि काम करण्याचा अहवाल मनपाला दिला.
सातारा आणि देवळाईत काही नागरिकांना दूषित, तर काहींना पाणीच मिळत नसल्याचा पाठपुरावा ‘दिव्य मराठी’ने केला. नगरसेविका सायली जमादार यांच्यासह मनपा प्रशासनानेही याची दखल घेतली. शनिवारी मनपाचे कनिष्ठ अभियंता नारायण गिरी, डी. एस. शिरसाठ यांनी जमादार यांच्यासह पाणीपुरवठा विहिरीची पाहणी केली असता थेट खोलीकरण केलेल्या नाल्यातून विहिरीत पाणी येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी देता वापरण्यासाठी द्यावे, एन-७ येथील जलकुंभावरून एक ब्लिचिंग पावडरची बॅग आणून पाण्यात टाकूनच पाणी वितरित करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. शिवाय पाणी शुद्ध करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था विकसित करता येईल का किंवा नवीन टाकी बांधून त्याद्वारे स्वच्छ पाणी पुरवता येईल का, याबाबतचा अहवाल ते देणार असल्याचे संकेत आहेत. मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

पैशाची येणार अडचण
मनपा दुरुस्तीचे काम करणार असल्याने तसेच ए-वनची कामे बंद करण्यात आल्याने हे काम करण्यासाठी लागणारा निधी कसा उपलब्ध होईल याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. एक दिवसाचे काम असूनही केवळ निधीअभावी काम थांबले आहे.
‘शुद्धपाण्यासाठी सातारा गावात आज सर्वेक्षण’ या शीर्षकांतर्गत वृत्त ‘दिव्य मराठी’त शनिवारी (२० ऑगस्ट) प्रसिद्ध होताच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सकाळीच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची जीव धोक्यात घालून साफसफाई केली.
मनपात समावेश झाल्यानंतर सातारा-देवळाईची अवस्था अत्यंत वाईट झाली असून नियोजनाअभावी येथील नागरिकांना दूषित पाणी मिळत आहे. मनपाचे अधिकारी शनिवारी विहिरींची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे पाणीपुरवठा अभियंता सरताजसिंग चहल यांनी शुक्रवारी सांगितले होते. हे वृत्त“दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन मनपाचे स्थानिक कर्मचारी किरण नरोडे, मुनवर शेख, राहुल शिनगारे, रसूल शेख, मांगीलाल चव्हाण यांनी सकाळी आठ वाजता सफाई करण्यास सुरुवात केली. अर्धा-पाऊण तास सफाई करून वरून पडलेली घाण काढून टाकली.
महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सातारा वॉर्डातील नागरिकांना पाणी असूनही पाणी मिळत नाही. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी सकाळी ११.४५ वा. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांना भेटून निवेदन दिले.

मनपा आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयात असल्यामुळे निवेदन अतिरिक्त आयुक्तांना दिले. निवेदनात म्हटले आहे, मनपात सातारा परिसर आल्यावर नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना अजूनही संघर्ष करावा लागत आहे. यामुळे आयुक्तांनी स्वत: सातारा परिसरात दौरा करावा आणि त्यांच्या नियंत्रणाखाली एक समिती नेमून विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

साताऱ्यात चार मुख्य रस्ते असून त्यांची अवस्था वाईट आहे. पथदिवे मंजूर असूनही त्याचे काम सुरू झाले नाही. ड्रेनेजलाइनचीही दुरुस्ती नाही. नागरिकांना दूषित पाणी मिळते, काही भागाला महिन्यांपासून पाणी नाही. कचरा गाड्या नसल्याने कुठेही कचरा टाकण्यात येतो. कबीरनगर ते एमआयटीकडे जाणारा रस्ता नाला वळवल्यामुळे चिखलमय झाला आहे. याचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनात केली आहे. या वेळी मनसेचे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, अमोल खडसे, संदीप कुलकर्णी, प्रवीण मोहिते, अविनाश पोफळे, किशोर पांडे, चेतन पाटील, मंगेश साळवे, प्रतीक गायकवाड, आकाश गोंडे, अनिकेत निलावार, चंदू नवपुते, सागर कुंटे, विनोद औटे, जय सरवयै उपस्थित होते.

सोमवारी निर्णय घेण्याचे आश्वासन :सुमीत खांबेकरअन्य पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. मनपाला सातारा देवळाईसाठी आठ कोटींचा निधी मिळाला असून तो तेथे खर्च करण्यास सुरुवात करणार आहोत. त्यासाठी सोमवारी आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन पवार यांनी या वेळी दिले.

दुरुस्तीची गरज
खंडोबा मंदिर परिसर, शंकरनगर, शाक्यनगर, गणेशबाग, गणेशनगर, भीमशक्तीनगर आणि १२ गल्ल्यांत किरकोळ दुरुस्तीअभावी पाणी येत नाही. केवळ एक किमीमध्ये तीन एमएमची पाइपलाइन टाकल्यास ही अडचण सुटू शकते, असे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. दोन छड्या टाकल्या तरी तत्काळ पाणी मिळणार असल्याने तसा अहवालच बनवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

यांची उपस्थिती
दूषित पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी करण्यात आली. यावेळी नगरसेविका सायली जमादार, मनपाचे कनिष्ट अधियंता नारायण गिरी, डी. एस. शिरसाठ, मनपाचे कर्मचारी किरण नरोडे, राहूल शिनगारे, मुनवर शेख, रसूल शेख, रमेश बत्तीसे, निवृत्त डीन भागवत जमादार.

जीव धोक्यात घालून सुरू होती सफाई
या वेळी कर्मचाऱ्याच्या कमरेला दोन दोरखंड बांधून विहिरीत सोडण्यात आले होते. दोन्ही दोरखंड दोन कर्मचाऱ्यांनी पकडून ठेवले होते. ज्या भागात घाण होती, तिकडे वरचे कर्मचारी विहिरीतील कर्मचाऱ्याला ओढत होते. अशा प्रकारे जीव धोक्यात टाकून ही सफाई करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...