आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपासमोर बिऱ्हाड आंदोलन, झोपडपट्टी विकासाचा २७ कोटींचा निधी गेला परत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दलितवस्त्या आणि झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी शासनाकडून निधी येऊनही महानगरपालिका आयुक्तांनी दलित वस्ती सुधार, सुवर्णजयंती योजना, घरकुल योजना अशा योजना राबवलेल्या नाहीत. याच्या निषेधार्थ नगरसेविका भारती महेंद्र सोनवणे यांच्या वतीने मनपाच्या गेटसमोर मंगळवारी बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले. या वेळी महिलांनी भाकरी केल्या, तर आणलेल्या पलंगावर मुलांची शाळा भरवण्यात आली होती.

आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन महापौर त्र्यंबक तुपे यांना दिले. त्यात म्हटले आहे की, दलित वस्त्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मोफत शौचालय, सुवर्णजयंती योजना, मोफत शिलाई मशीन वाटप, बचत गट सक्षम करण्यासाठी आर्थिक साहाय्य करणे, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांचे सर्वेक्षण करणे, ड्रेनेज लाइन, विद्युत खांब बसवून पाणीपुरवठा करणे, सामाजिक सभागृह उभारून रस्त्याची व्यवस्था करणे आणि स्मशानभूमीत सुविधा पुरवण्याबाबत अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येते.
हा मागासवर्गीय नागरिकांवर अन्याय आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. या वेळी महेंद्र सोनवणे, ज्योती अभंग, जयेश अभंग, प्रेमलता दाभाडे, विजया बनकर, रूपचंद वाघमारे, मिलिंद दाभाडे, लक्ष्मण भुतकर, गौतम खरात, संदीप कंठे, प्रकाश पवार, संतोष गायकवाड, शौकत पटेल, चंदू बोर्डे, संगीता तायडे, सुमन भिवसने, गीता म्हस्के, पार्वती घोरपडे, चंद्रकला आदमाने आदी उपस्थित होते.

निधी परत, जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करा
झोपडपट्टीभागात सुविधा पुरवण्यासाठी २७ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात आला होता. मात्र, हा निधीही परत गेला आहे. याला मनपा आयुक्त डॉ. प्रकाश महाजन यांना दोषी धरून त्यांच्यावर अॅट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल करावा. तसेच हा निधी परत जाण्यास जे अधिकारी दोषी असतील, त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.