आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवसुलीचे अडले घोडे, सॉफ्टवेअर अपडेट न केल्यामुळे कर भरण्यासाठी आलेले गेले परत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सॉफ्टवेअर अपडेट केल्यामुळे एकदम पाच वर्षांच्या कराचा भरणा करण्यासाठी आलेल्या नागरिकांना आल्यापावली परतावे लागत असल्याचा प्रकार सोमवारी घडला. या प्रकाराची माहिती मिळताच सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे आदेश मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले.

पाच वर्षांचा कर एकदाच जमा करणाऱ्या नागरिकांना दोन वर्षांच्या सामान्य करांत सूट देण्यात येते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जागरूक नागरिक वॉर्ड कार्यालयात येतात. मात्र, तुमचे काम आत्ताच होणार नाही, म्हणत येथील अधिकारी, कर्मचारी या नागरिकांना पिटाळून लावत असल्याची तक्रार स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांनी बकोरिया यांच्याकडे केली होती. त्या वेळी बकोरिया यांनी माहिती घेतली असता सॉफ्टवेअर अपडेट नसल्याचे समोर आले. त्यामुळेच करभरणा करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धावाधाव केली जात असताना स्वत:हून कर भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तशी सुविधा मिळत नसल्याचा प्रकार समोर आला. यावर सॉफ्टवेअर तत्काळ अपडेट करून नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश बकोरिया यांनी दिले. पण असे प्रकार घडत असल्याने कर भरणा करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.


ऑनलाइनमध्येही अडचणी
महापालिकेच्या संकेतस्थळावर मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याची सुविध उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु यातही अनंत अडचणी आहेत. मालमत्ता कर जमा करण्यासाठी "पे यू' आणि एचडीएफसी हे दोन पेमेंट मोड देण्यात आले आहेत. "पे यू' मोडमध्ये नेट बँकिंग आणि वॉलेट अशा दोन पद्धती देण्यात आल्या आहेत. नेट बँकिंगच्या यादीत अनेक स्थानिक बँकांचा समावेश नाही.