आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त "पोल्ट्री फार्म' टाळण्यासाठी शिवसेना सदस्यांची दांडी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महापािलकेच्या स्थायी समितीच्या बैठकीला गुरुवारी शिवसेनेचे दोन्ही सदस्य अनपेक्षितपणे अनुपस्थित राहिले. सभेत योगेश जव्हेरी यांच्या पोल्ट्री फार्मवर कारवाईचा विषय सभेत येणार असल्याने वाईटपणा नको म्हणूनच सदस्यांनी दांडी मारल्याचा अर्थ बैठकीनंतर काढला जात होता.
सभागृहात भाजपच्या सदस्यांनी भोगवटा प्रमाणपत्राचे हे प्रकरण लावून धरल्याने अखेर सभापतींना भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पोल्ट्री फार्मसाठी बांधकाम परवाना घेऊन तेथे कारचे सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाचे जैसे थे आदेश असतानाही महापालिकेने त्यांना भोगवटा प्रमाणपत्र िदले. वरवर साध्या वाटणाऱ्या या प्रकरणात राजकीय हितसंबंध असल्याने गेल्या आठवड्यात हा विषय येताच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनीही या विषयात लक्ष घालणे सुरू केले. अशा स्थितीत गेल्या सभेत सभापतींनी दिलेल्या स्थळपाहणी पंचनाम्याचा अहवाल सादर होणार असल्याने आजची बैठक वादळी ठरणार हे अपेक्षित होतेच. पण राजकीय हितसंबंधांमुळे जर काही अप्रिय निर्णय घ्यावा लागला तर आपला सहभाग नको, या हेतूनेच शिवसेनेचे स्थायी समितीतील सदस्य गैरहजर राहिल्याचे बोलले जात आहे. परिणामी आजच्या बैठकीला शिवसेनेचे फक्त सभापती विजय वाघचौरेच होते. एरवी प्रत्येक विषयात हिरीरीने बोलणारे त्र्यंबक तुपे तर जवळपास प्रत्येक बैठकीला हजर असणारे आगा खानही गैरहजर होते. शिवसेनेची कोंडी लक्षात घेऊन भाजपने जोरदार हल्लाबोल केला. त्यासाठी शिवसेनेतून आलेल्या जगदीश सिद्ध, सुरेंद्र कुलकर्णी यांच्यावरच ती जबाबदारी सोपवल्याचे जाणवत होते. त्यांनी संजय चौधरी व इतरांनी लढवलेल्या किल्ल्यावर आपल्या शाब्दिक हल्ल्याच्या माध्यमातून दबाव वाढवून भोगवटा प्रमाणपत्र रद्द करायला लावले.
न येण्याची सांगितलेली ही कारणे!
आज शहरात विवाह सोहळे होते. संध्याकाळपर्यंत लग्नसमारंभांनाच हजेरी लावणे सुरू होते.
त्र्यंबक तुपे, सदस्य, स्थायी समिती
अर्जंट काम होते, त्यामुळे बाहेरगावी जावे लागले. सायंकाळी शहरात परत आलो.
आगा खान, सदस्य, स्थायी समिती