आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Taxation, Eldest Citizen,Divya Marathi

एकीकडे ठणठणाट, दुसरीकडे छळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्मचार्‍यांचा तुटवडा, कक्ष अधिकार्‍यांची कमी संख्या, त्यात कर आकारणी कक्षाच्या प्रमुखांवर इतर विभागांची जबाबदारी.. यामुळे कर आकारणीतील समस्यांची तब्बल 575 प्रकरणे प्रलंबित आहेत. या विभागात 6 प्रभागांसाठी किमान 58 अधिकारी-कर्मचार्‍यांची गरज असताना केवळ 20 कर्मचारी आहेत. त्यांचीही प्रामाणिकपणे काम करण्याची मानसिकता कमीच..परिणामी आधीच कंगाल असलेल्या पालिकेच्या तिजोरीत पैसाच जमा होत नाही. कर न भरणारे गबर होत आहेत, तर प्रामाणिकपणे कर भरण्यासाठी येणार्‍यांचा छळ केला जातो. यामुळे एकूणच मनपाची स्थिती सुधारण्यासाठी विशेष कर आकारणी कक्ष विभागात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.
अशी आहे विभागाची स्थिती
विशेष कक्ष कर आकारणी विभाग सहा प्रभागांतील 99 वॉर्डांना जोडण्यात आला आहे. त्यात 1 लाख 85 हजार 715 करदात्यांचा समावेश आहे. कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्याने साडेसोळा टक्क्यांनी पालिकेची वसुली कमी झाली असून जवळपास 575 प्रकरणे प्रलंबित आहेत. या विभागात 3 कक्ष अधिकारी सकाळी फील्डवर जातात, तर दुपारी 4 नंतर कार्यालयात असतात. वसुली, सर्वेक्षण, आयुक्तांकडील अपील, कोर्टकचेरी ही जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे अनेकदा त्यांना कार्यालयात यायलाही जमत नाही. कक्ष अधिकार्‍यांची संख्या किमान 6 असणे आवश्यक आहे, परंतु कर आकारणीसाठी तीनच सदस्य आहेत. त्यातही वॉर्ड अ आणि ड या वॉर्डांची जबाबदारी असणार्‍या कक्ष अधिकार्‍याला वॉर्ड इ मधील प्रभाग अधिकारी म्हणून काम करावे लागते. याचा फटका शहरभरातील करदात्यांना बसत आहे.
डीबी स्टार तपास
प्रतिनिधीने करदात्याचा भूमिकेत पालिका मुख्यालयातील तिसर्‍या मजल्यावर असलेल्या विशेष कक्ष कर आकारणी विभागात तिन्ही कक्ष अधिकार्‍यांच्या कक्षात आठ दिवस तक्रारीचा कागद घेऊन फिरला, मात्र अधिकारी फील्डवर आहेत, कोर्टात गेले, आयुक्तांच्या बैठकीला गेले, कर निर्धारक व संकलांकडे हिअरिंगला गेले, तर कधी माहिती आयुक्तांकडे गेले अशीच उत्तरे मिळाली.
संपूर्ण शहराचा भार
सन 1997 ला या विभागाची झोन क्रमांक 1 आणि झोन क्रमांक 2 अशी रचना होती. झोन क्रमांक 1 साठी 13 तांत्रिक कर्मचारी, तर झोन 2 साठी 16 तांत्रिक कर्मचारी, असे एकूण 29 कर्मचारी होते. मात्र, आता शहराचा आवाका वाढला. त्यात 2006 नंतर सिडको- हडकोचा व्यापही वाढला. किमान 6 प्रभागांसाठी 58 कर्मचारी हवेत. सद्य:स्थितीत विशेष कर आकारणी विभागात 3 प्रमुख कक्ष अधिकारी, 10 तांत्रिक कर्मचारी, 4 लिपिक ,3 शिपाई असे एकूण फक्त 20 कर्मचारी आहेत. त्यात फील्डवरचे काम असल्याने यातील निम्म्यापेक्षा अधिक बाहेरच असतात, तर प्रमुख अधिकारी बैठका, अपील, कोर्टकचेरीच्या कामात गुंग असतात. त्यामुळे लोकांच्या तक्रारी ऐकायला कुणीच नसते. परिणामी वर्षानुवर्षे अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात.
प्रमुखाकडे सहा खात्यांचा भार
विशेष कक्ष कर आकारणी कक्षाचे प्रमुख कर निर्धारक व संकलक शिवाजी झनझन यांच्याकडे इतर 6 विभागांचा भार आहे. विशेष कक्ष कर आकारणी विभागातून मंजुरीसाठी गेलेली प्रकरणे सहीसाठी रखडतात.
शंभर कोटींच्या उद्दिष्टावर परिणाम
ढिसाळ कारभारामुळे तिजोरी रिकामी आहे. एकीकडे 100 कोटींचे उद्दिष्ट ठेवायचे, तर दुसरीकडे प्रत्यक्षात दिलेले 80 कोटी जमा करतानाही नाकीनऊ येत आहेत. मनपाचा महत्त्वाचा विभागच असे आचके देत आहे.
काय आहे प्रकरण?
एकनाथनगर गृहनिर्माण सोसायटीतील रहिवासी रखमाजी जाधव हे कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक होते. त्यांनी 10 वर्षांपूर्वी एकनाथनगरत म्हाडाचे एक जुने घर विकत घेतले. घरपट्टी भरण्यासाठी ते वॉर्ड ‘फ’ कार्यालयात गेले. वर्षभरापूर्वी 343 रुपये घरपट्टी आकारणी झालेली असताना दुसर्‍याच वर्षात त्यांच्या घरपट्टीत थोडथोडकी नव्हे, तर तब्बल 45 टक्के वाढ करण्यात आली. त्यांनी ती भरलीही. त्यानंतर कर आकारणीतील चुकीची दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी आठ वर्षांपासून करभरणा केलेल्या पावत्या आणि अर्ज घेऊन वॉर्ड फ कार्यालय ते मुख्यालयातील विशेष कर आकारणी विभागात चकरा मारल्या; पण कुणीही त्यांच्या या समस्येची दखल घेतली नाही.
वर्षानुवर्षे टोलवाटोलवी
जाधव यांनी जुन्या घरमालकाचे नाव बदलून घरपट्टीचे नामांतर करताना 2004 ते 05 या वर्षी 343 रुपये कर भरला होता. त्याची पालिकेच्या दप्तरी नोंदही आहे. पण वर्षभरानंतर त्यांना 1625 रुपये घरपट्टी आकारण्यात आली. या वेळी जुन्या घरमालकाला जो कर लावला होता त्याप्रमाणेच कर लावावा, असा तगादा जाधव यांनी लावला. पण तुम्ही घरपट्टी भरा, काय सांगायचे ते वॉर्ड अधिकार्‍याला सांगा, असा सल्ला वॉर्ड फ च्या लिपिकाने दिला. जाधव यांनी जास्तीची घरपट्टी भरली, वॉर्ड अधिकार्‍यांच्यी भेट घेतली. यानंतर त्यांनी अर्ज करा, जुन्या घरमालकाच्या आणि आताच्या कर भरल्याच्या पावत्या जोडा, आम्ही स्थळपाहणी करून चुकीची दुरुस्ती करू, असे सांगून जाधव यांची बोळवण केली. दुसरीकडे रिकामी तिजोरी भरण्यासाठी या ज्येष्ठ नागरिकाचा खिसा कापण्याचा उद्योग वॉर्ड ‘फ’ च्या कर आकारणी कक्षाने सुरूच ठेवला.रखमाजी जाधव यांनी कर आकारणी विभागाच्या सतत आठ वर्षे चकरा मारल्या. त्यात अशा प्रकारे जिणे चढणे आणि उतरणे हा या ज्येष्ठ नागरिकाचा नित्यक्रम झाला होता.
आयुक्तांनी घेतली दखल
आठ वर्षांपासून सर्व कागदपत्रे असूनही पालिका दखल घेत नसल्याचे पाहून जाधव चक्रावून गेले. शेवटी त्यांनी डीबी स्टारकडे कैफियत मांडली. चमूने तपास करून थेट आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे प्रकरण मांडले. त्यावर आयुक्तांनी जाधव यांच्या प्रकरणाचा 7 दिवसांत निपटारा करण्याचे आदेश दिले. अधिकार्‍यांनी लगेच अहवालही दिला.
सगळे सारखेच
जाधव यांनी वॉर्ड फ कार्यालयाचा पिच्छा सोडला नाही. 2010 मध्ये ते चूक दुरुस्त करण्यासाठी गेले तेव्हा तुमचे काम मुख्यालयातील विशेष कक्ष कर आकारणी विभाग यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. तेथे गेल्यावर जाधव यांच्या तक्रारीची कोणी दखल घेतली नाही.
शिवाजी झनझन, कर निर्धारक व संकलक