आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना केंद्रेकर आले ना महाजन, सकाळपासूनच कर्मचारी पाहत होते आयुक्‍ताची वाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दिवसभर प्रतीक्षा सकाळपासूनच मनपातील कर्मचारी पाहत होते दोन्ही अधिकाऱ्यांची वाट सोमवारी रात्री उशिरापर्यंत विधिज्ञांशी चर्चा करून याचिका तयार केल्यावर महाजन यांनी अचानक माघार का घेतली, याविषयी राजकीय प्रशासकीय गोटात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

आजप्रकाश महाजन आयुक्तपदाचा कार्यभार सुनील केंद्रेकर यांच्याकडे सोपवणार असल्याने सकाळपासून महापालिका त्यांच्या प्रतीक्षेत राहिली. दिवसभर वाट पाहून ना महाजन आले ना केंद्रेकर. शेवटी केंद्रेकर उद्या पदभार घेणार हे सायंकाळी स्पष्ट झाले. मात्र, तोपर्यंत सस्पेन्स कायमच राहिला.

काल सामान्य प्रशासन खात्याच्या अपर सचिवांनी महाजन यांनी सुनील केंद्रेकर यांना पदभार द्यावा, असे पत्र जारी केले. त्यानंतर आज सकाळी पदभार सोपवण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे आज सकाळी दहा वाजेपासून मनपा आयुक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. दालन तयार ठेवण्यात आले होते. पण थोड्याच वेळात समजले की प्रकाश महाजन मुंबईहून निघाले आहेत. दुपारी पोहोचतील. अधिकारी वर्गही थोडा निवांत झाला. दरम्यानच्या काळात महाजन कोठपर्यंत आले याची माहिती घेण्याची चढाओढ सुरू होती. काहींनी ते पुण्यात आहेत, नगर क्राॅस केले, नेवाशापर्यंत आले, अशा खबरी पसरवल्या. पण दुपार टळून गेली. सायंकाळ झाली. शेवटी आज महाजन आणि केंद्रेकर मनपात येणार नाहीत, उद्या पदभार दिला जाईल, असे सांगण्यात आले. सायंकाळी पुन्हा एकदा विभागीय आयुक्त डाॅ. उमाकांत दांगट यांनी महाजन केंद्रेकर यांना भेटीसाठी बोलावल्याचे कळल्यावर आजच केंद्रेकर पदभार घेतील, अशी चर्चा सुरू झाली. पण उशिरा तीही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी आज मनपात दिवसभर वाट पाहण्याचाच कार्यक्रम रंगला. पण सरतेशेवटी ना महाजन आले ना केंद्रेकर.
दरम्यान, महाजन यांनी आपणास आयुक्तपदावरून हटवण्याच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका बुधवारी सकाळी मागे घेतली. आैरंगाबाद हायकोर्टाचे न्या. संजय गंगापूरवाला न्या. व्ही. के. जाधव यांच्यासमोर त्यांनी अॅड. सतीश तळेकरांमार्फत याचिका दाखल केली होती.
त्यात त्यांनी महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियमातील कलम ३६ (३) च्या वैधतेस आव्हान दिले होते. आपणास पदावरून हटविण्यासाठी कशाप्रकारे दबाव आणला यासंबंधी सविस्तर मुद्दे मांडले होते. शिवाय थेट पालकमंत्री रामदास कदम यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. असे असताना आपले विधिज्ञ अॅड. तळेकर यांना त्यांनी मंगळवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी याचिका पुढे चालविण्याची मानसिकता नसल्याचे सांगितले.
यावर तळेकरांनी त्यांना सांगितले की, यासंबंधी तोंडी काही सांगता लेखी स्वरूपात आपणास कळविले तर आपणाकडून हायकोर्टास विनंती केली जाईल असे सांगितले. यानंतर महाजन यांनी मंगळवारी सायं. ७.४९ वाजता मेलवरून याचिका मागे घेण्यासंबंधी विनंती केली. उपरोक्त मेल अॅड. तळेकर यांच्यावतीने अॅड. उमाकांत आवटे यांनी बुधवारी सकाळी १०.३० वाजता हायकोर्टासमोर ठेवला. हायकोर्टाने याचिकाकर्त्यास याचिका मागे घेण्याची परवानगी दिली.

का घेतली महाजनांनी माघार
गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी मनपाचे सभागृह सज्ज करण्यात आले. मात्र, या सभेचे प्रशासकीय प्रमुख म्हणून कोण काम पाहणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
केेंद्रेकर यांच्या नियुक्तीचे आदेश जारी झाल्याने खुर्ची परत मिळणे मुश्कील असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.

मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय असलेल्या एका बड्या अधिकाऱ्याने याचिका मागे घेण्यासाठी समजूत घातली.

न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवृत्तीनंतरचे लाभ अडकू शकतात, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

पालकमंत्री कदम यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केल्यावर मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधून माघार घेण्यास सांगितले.

जंजाळ करणार महाजनांवर दावा
महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेचा गैरवापर करून १.५ लाख रुपयांचे देणे लागत असल्याने नोटीस दिल्यानंतर दोनच दिवसांत आपल्यावर अविश्वास ठराव मांडला गेला, असा आरोप महाजनांनी याचिकेत केल्याने संतापलेले सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी महाजनांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असे बुधवारी जाहीर केले. महाजनांनी जी विधाने याचिकेत केलीत ती सारी धादांत खोटी आहेत, असे ते म्हणाले.