आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा मनपाच करणार, जिल्हा कोर्टाचा आदेश खंडपीठाकडून रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा ताबा घेण्यास मनाई करणारा जिल्हा न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे यांनी सोमवारी रद्द ठरवला. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचा ताबा घेण्याचा महापालिकेचा मार्गही मोकळा झाला आहे. शिवाय औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीची बँक गॅरंटी जप्त करू नये यासाठी कंपनीने दाखल केलेले अपीलही खंडपीठाने खारिज केले. दरम्यान, अपूर्ण समांतर योजना महापालिकाच पूर्ण करणार असून केंद्राकडून मिळालेल्या निधीतील ३२८ कोटी रुपयांत जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान मुख्य पाइपलाइन टाकण्याचे काम केले जाईल, असे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
औरंगाबाद महापालिकेने आॅक्टोबर रोजी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार रद्द केला. महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध कंपनीने जिल्हा न्यायालयात उलवाद कायद्याच्या कलम नुसार महापालिकेस पाणी योजनेचा ताबा घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत दावा दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने आॅक्टोबर २०१६ रोजी महापालिकेला पाणीपुरवठा योजनेचा ताबा घेण्यास मनाई केली होती. मंगळवारी (दि. १८) न्यायालयाने कंपनीचा वरील अर्ज खर्चासह मंजूरही केला होता. या आदेशास महापालिकेने खंडपीठात आव्हान दिले होते. हे अपील खंडपीठाने मंजूर करतानाच बँक गॅरंटी महापालिकेने जप्त करू नये, अशी विनंती करणारे कंपनीचे अपीलही खंडपीठाने खारिज केले. त्याचप्रमाणे त्रिसदस्यीय समितीचे सदस्य म्हणून निवृत्त सचिव तांबे यांचे नाव महापालिकेने सुचवल्यामुळे खंडपीठाने कंपनीचे अपील निकाली काढले. या प्रकरणात अॅड. अनिल बजाज यांना अॅड. दीपक पडवळ, अॅड. हर्षिता मंगलानी, अॅड. हर्षवर्धन बजाज, अॅड. नवीन पेद्दी आणि अॅड. ऋचीर वाणी यांनी सहकार्य केले. कंपनीतर्फे अॅड. रामेश्वर तोतला यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. राहुल तोतला आणि अॅड. मनोरमा मोहंती यांनी सहकार्य केले.
पाइपलाइन टाकण्याची तयारी : जायकवाडीते नक्षत्रवाडीपर्यंत ४३ किलोमिटर मुख्य पाइपलाइन टाकण्याचे काम मनपा करणार आहे. शासनाकडून मिळालेल्या ३२८ कोटी रुपयांतून हे काम करण्यास परवानगी आवश्यक असून तसा प्रस्ताव शासनाला पाठवणार असल्याचे आयुक्त बकोरिया यांनी सांगितले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतच्या ५० किमी पैकी सात किमीपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने केले आहे. उर्वरीत ४३ किलोमीटरपर्यंत दोन हजार मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम अपूर्ण आहे.
२०० एमएलडी पाणी आणण्यास प्राधान्य
खासगी कंपनीने शहरात जलवाहिनी टाकण्याचे २५ ते ३० टक्के काम केले आहे. मनपातर्फे मुख्य जलवाहिनी टाकून २०० एमएलडी पाणी शहरात आणण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. नंतर शहरातील कामे केली जातील. यासाठी किती खर्च येणार, किती सामग्री सध्या उपलब्ध आहे किती नव्याने खरेदी करावी लागेल, याचेही नियोजन केले जाईल.
बातम्या आणखी आहेत...