आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यातील अनधिकृत मजले इमारतींचा मनपा करणार सर्व्हे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - साताऱ्यात बिल्डर लॉबीने केलेल्या अनधिकृत बांधकामावर गतवर्षी महसूल प्रशासनाने हातोडा उगारला होता. मात्र, पाडलेले मजले दुरुस्त करून विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू करत रहिवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार काही महिल्यांनी सुरू झाला. यावर ३० ऑगस्ट रोजी "नफेखोरीसाठीरहिवाशांच्याजिवाशी खेळ’ या वृत्ताद्वारे "दिव्यमराठी’नेया गंभीर प्रकारावर सर्वप्रथम प्रकाश टाकला. त्याची दखल घेत मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अनधिकृत मजल्यांसह इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश नगर रचना विभागाला दिले आहेत.
साताऱ्यात डिसेंबर २०१५ रोजी महसूल विभागाने अनधिकृत मजल्यांवर कारवाई सुरू केली. नियमांना बगल देत बांधकाम करणाऱ्या ३८० इमारतींना प्रशासनाने नोटीस बजावत त्यापैकी ५७ इमारतींचे मजले प्रशासनाने पाडले. ४३ बिल्डर आणि नागरिकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम पाडणार असल्याचे लेखी शपथपत्र सादर केले होते. त्यातील केवळ १० जणांनीच बांधकाम पाडले. उर्वरित २८० अनधिकृत बांधकामावर प्रशासनाने कारवाई केली नाही. दरम्यान, दोन महिन्यांनी सातारा, देवळाई मनपात समाविष्ट झाले. पुढे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा मागे पडला. याचा गैरफायदा घेत हा गोरखधंदा सुरू झाला. हा प्रकार ‘दिव्य मराठी’ने सर्वप्रथम समोर आणला. त्याच वेळी कठोर कारवाई करण्याचे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले होते. याबाबत पुन्हा माहिती घेतली असता आता पावसाळा संपत आला असून नगर रचना विभागाकडून सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.
अनधिकृत मजले पाडण्यासाठी महसूल प्रशासनाने अत्याधुनिक यंत्राचा वापर केला. व्हायर्ब्रेशन मशीनद्वारे काही इमारतींचा एक तर काहींचे दोन मजले पाडण्यात आले. पाडापाडीमुळे तकलादू झालेल्या या इमारतींवर केव्हाही अरिष्ट येऊ शकते. याची कल्पना असूनही हेच मजले डागडुजी करून विकण्यात आले. काही ठिकाणी भाडेकरू ठेवण्यात आले. त्यांच्या जिवाला धोका असल्याचे आयुक्तांनीही स्पष्ट केले होते.

इमारतींचेही सर्वेक्षण
गतवर्षीमहसूल विभागाने केवळ अनधिकृत मजल्यांवर कारवाई केली होती. आता मनपाकडून अशा मजल्यांसह अनधिकृत इमारतींचेही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे सिडको, मनपाच्या परवानगीशिवाय बांधलेल्या इमारतींवरही भविष्यात हातोडा पडण्याची चिन्हे आहेत.

लवकरच कारवाई
^पावसाळा असल्याने कारवाई, सर्वेक्षण थांबवले होते. नगर रचना विभागाला सर्वेक्षणाचे आदेश दिले असून लवकरच अनधिकृत मजले, इमारतीवर कारवाई करण्यात येईल. ओमप्रकाश बकोरिया, मनपा आयुक्त
बातम्या आणखी आहेत...