आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा तयार करणार नो हॉकर्स झोन, सराफा बजारातील सर्व हातगाड्या हटवल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहागंज परिसरात हातगाडीवाल्यांच्या त्रासामुळे निर्माण झालेली परिस्थिती आगामी काळात येऊ नये यासाठी महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्ते नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी हॉकर्स झोन म्हणून भागांची यादी तयार करण्याच्या सूचना मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिल्या आहेत.

गेल्या सहा दिवसांपासून शहागंज, गांधी पुतळा, सिटी चौक व सराफा हा भाग हातगाडीवाल्यांनी व्यापून टाकला होता. रस्त्याच्या मधोमधच नव्हे, तर दोन्ही बाजूंच्या दुकानांसमोर लागलेल्या हातगाड्यांमुळे या परिसरातील व्यापा-यांचा धंदाच बंद करून टाकला. परिणामी रमजान ईदच्या काळातही व्यापा-यांना व्यवसाय करताना अडथळे येऊ लागल्याने त्यांनी चक्क तीन दिवस दुकाने बंद ठेवून मनपा व पोलिसांचा निषेध केला. दुकानांना कुलूप ठोकून किल्ल्या आयुक्तांकडे सोपवण्याच्या आंदोेलनाची घोषणा त्यांनी केल्यानंतर काल मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या सूचनेनुसार उपायुक्त किशोर बोरडे, शिवाजी झनझन यांच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात कारवाई करीत मंगळवारी 100 हून अधिक हातगाड्या हटवल्या.
आजही सकाळी पुन्हा एकदा कारवाई करीत तेवढ्याच गाड्या हटवण्यात आल्या. परिणामी 350 हून अधिक दुकानांसमोरील हातगाड्या आता हटल्या आहेत. रस्त्यावरून वाहने जाण्याएवढी जागा आता तयार झाली आहे. आजही माजी आमदार किशनचंद तनवाणी, नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी कारवाईनंतर व्यापा-यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. नंतर दुकाने उघडण्यात आली. अतिक्रमण हटाव विभागप्रमुख शिवाजी झनझन यांनी सांगितले की, आजच्या कारवाईमुळे रस्ता चांगला मोकळा झाला आहे. उद्याही मनपाचे पथक दिवसातून दोन वेळा या भागात फेरी मारून हातगाड्या हटवणार आहे.

आयुक्त म्हणतात, लवकरच हॉकर्सझोन तयार करू
आता एकापाठोपाठ एक सण येत असल्याने बाजारपेठांत अशीच समस्या उभी राहू शकते, हे ध्यानात घेऊन मनपाने शहागंज, सिटी चौक समस्येपासून धडा घेतला. ‘दिव्य मराठी’शी बोलताना मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले की, शहरातील प्रमुख रस्ते नो हॉकर्स झोन करण्यात येणार आहेत. त्यासाठी आधी हॉकर्स झोन निवडण्यात येणार असून त्यांची यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.