आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipality One, Commissioner In Charge Of The Two

पालिका एक, मात्र प्रभारी आयुक्त दोन! मुख्यमंत्र्यांच्या नोटिंगनुसार केंद्रेकरांची नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सोमवारी(दि. १६) नगरविकास खात्याने आयुक्त प्रकाश महाजन यांचा कार्यभार पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त आयुक्तांकडे सोपवण्याचा आदेश जारी करून २४ तास उलटत नाहीत, तोच सामान्य प्रशासन विभागाने आज महाजन यांच्याकडील पदभार सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्याकडे सोपवण्याचा आदेश जारी केला.
या प्रकारामुळे प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून मनपा एक, आयुक्त दोन अशी अजब स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच केंद्रेकर यांच्याबाबतचा आदेश काढल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटल्याने नगरविकास खात्याने कालचा आदेश कसा काढला, असा नवीन पेच निर्माण झाला आहे.
२० आॅक्टोबर रोजी सुरू झालेले मनपातील आयुक्त हटाव नाट्य काल नगरविकास खात्याचा आदेश आल्यावर संपले, असे वाटत होते. काल सायंकाळी आयुक्तांच्या कार्यालयात शासन निर्णय येऊन धडकला. त्यात प्रकाश महाजन यांना मुंबईत सामान्य प्रशासन विभागात रुजू हाेण्यास सांगण्यात आल्याचे त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे या पदाचा पुढील आदेश येईपर्यंत कार्यभार सोपवण्यात आल्याचे म्हटले होते.

पवारांच्या भेटीगाठी
आजप्रकाश महाजन मनपात आलेच नाहीत; पण शासनाने आदेश जारी केल्याने त्यानुसार रमेश पवार यांनी त्या पदाचा कार्यभार घेतला आपल्या दालनातून कामकाजाला प्रारंभही केला. काही अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, काही विभागांकडून माहिती मागवणे, स्मार्ट सिटीच्या प्रकल्प सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे आदी कामे त्यांनी आज सकाळपासून केली. सायंकाळपर्यंत सारे बरे चालले होते.
नवीन आदेश धडकला : सायंकाळीसाडेसहा वाजेच्या सुमारास आयुक्तांच्या सचिवांकडे सामान्य प्रशासन विभागाचे पत्र येऊन धडकले. अपर मुख्य सचिव (सेवा) डाॅ. भगवान सहाय यांनी प्रकाश महाजन यांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, औरंगाबाद मनपा आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेंकर यांच्याकडे सोपवून कार्यमुक्त व्हावे. आपल्या नवीन नियुक्तीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

मुख्यमंत्र्यांच्यासूचनेनुसारच : यासंदर्भात"दिव्य मराठी'ने सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डाॅ. भगवान सहाय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नगरविकास खात्याने असा आदेश काढल्याचे माहीतच नसल्याची धक्कादायक माहिती दिली. या फाइलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या सूचनेनुसारच आपण केंद्रेकर यांच्याशी बोलून आज हे आदेश काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे याबाबत विचारणा करण्यासाठी नगरविकास सचिव मनीषा म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. एकूणच या प्रकारामुळे सरकारच्या दोन खात्यांत समन्वय नसल्याचेच चित्र समोर आले .

केंद्रेकर आज पदभार स्वीकारणार
दरम्यान,आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या प्रकाश महाजन मनपात येणार अाहेत केंद्रेकरही त्याच वेळेत येणार आहेत. त्यानंतर महाजन आपल्या पदाची सूत्रे केंद्रेकर यांच्याकडे सोपवणार आहेत.

कोणता आदेश वैध?
कालचानगरविकास खात्याचा आदेश वैध मानायचा की आजचा सामान्य प्रशासनाचा, असा नवीनच संभ्रम निर्माण झाला आहे. कालचा आदेश आल्याने आज अतिरिक्त आयुक्तांनी महाजनांच्या अनुपस्थितीत पदभार घेतला. आता सामान्य प्रशासनाच्या आदेशानुसार केंद्रेकरांनी महाजन यांच्याकडून पदभार घ्यायचा आहे, पण महाजन यांच्याकडील पदभार पवारांकडे असेल तर केंद्रेकर तो महाजनांकडून कसा घेणार, असा नवीन पेच निर्माण झाला आहे. शिवाय एकाच मनपाला दोन आयुक्त, असा अजब प्रकारही घडला आहे.