आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा म्हणते, टीडीआर घ्या; व्यापारी म्हणतात, रक्कम द्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालनारोड सहापदरीकरणाचा मार्ग सरकारी पातळीवर मोकळा झाला असला तरी मोबदल्यावरून नागरिक आणि मनपा प्रशासनात एकमत नाही. मनपा मालमत्ताधारकांना टीडीआर देत आहे; परंतु मालमत्ताधारक नगदी पैसे मागत असल्यान ३० टक्के अतिक्रमण हटवण्याचे काम रखडले आहे. दरम्यान, या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून सप्टेंबरअखेर सहापदरीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश दिल्लीतून आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन वर्षांपासून जालना रोड विस्तारीकरणाचे घोंगडे भिजत आहे. यात मनपाची भूमिका तळ्यात - मळ्यात राहिली. कारण मनपाकडे भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी पैसेच नाहीत. मनपाने अधिग्रहित जमिनीच्या मोबदल्यात टीडीआर देऊ केला. मात्र, आम्हाला नगदी पैसे द्या, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. अशाही परिस्थितीत रस्ता विस्तारीकरणाचा आग्रह दिल्लीतून होत आहे. केंब्रिज ते नगर नाका या १४ किमी रस्त्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुकुंदवाडी शिवाजीनगर रेल्वे भागातील दोन रेल्वे ओव्हरब्रिजसाठी शंभर कोटी, तर बीड बायपास रोड ६० फूट करण्यासाठी ३०० कोटी अशी आठशे कोटींची कामे गडकरींनी मंजूर केली आहेत. रेल्वे ब्रिजसह बीड बायपास कामाच्या लवकरच निविदा निघतील, मात्र जालना रोड विस्तारीकरणात अडथळे आल्याने या कामाच्या निविदा सप्टेंबरमध्ये निघतील, असा विश्वास एनएचएआयच्या सूत्रांनी व्यक्त केला.
कारण किलोमीटरच्या पट्ट्यात दाट वाहतुकीचा अंदाज घेऊन दोन्ही बाजूंनी फूटब्रिज राहील, फूटपाथ, ओव्हरब्रिज अणि भुयारी मार्गही होणार आहे.
नकाशे मॅपिंगचे काम एनएचआयने केले
जालनारोडबाबतचे अपडेटेड फोटो, नकाशांची पूर्तता मनपाने करायची होती. मात्र, या कामी दिल्लीवरून रेटा आल्याने गेल्या १५ दिवसांत एनएचआयच्या अधिकाऱ्यांनी जालना रोडचे मोजमाप करून रुंदीकरणाच्या नकाशांचे काम सुरू केले आहे. या कामाचे लवकरच टेंडर निघून सप्टेंबरअखेर काम सुरू होईल.

दिल्लीवरून आग्रह, गल्लीत घोडे अडले

केंद्राने शहरातील या कामांसाठी आठशे कोटी रुपये मंजूर केले असले तरी मनपाकडे मोबदला देण्यासाठी पैसे नसल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली. या कामासाठी केंद्रीय भूपृष्ठ जलवाहतूक मंत्री कार्यालयाचा जोरदार रेटा आहे. जालना रोडवरील युटिलिटी कामांचा खर्च केंद्रच करणार आहे.
नोटीस देता जागा अधिग्रहित केली
जमीन अधिग्रहणाची कारवाई अत्यंत चुकीच्या पद्धतीने केली आहे. मनपाने कोणतीही नोटीस देता जागा घेतली. त्या मोबदल्यात एफएसआय, टीडीआर देत आहेत. याला आमचा ठाम विरोध आहे. -विशाल पांडे, मालक अतुल होंडा

टीडीआर नको, रोख पैसे द्या
आम्ही जालना रोडवर चाळीस वर्षांपासून दुकान चालवत आहोत. हा रस्ता मोठा करण्याची गरज नव्हती. ट्रॅफिक मॅनेजमेंट नीट केली तरी सध्याचा रस्ता पुरेसा ठरेल. आता मनपाने टीडीआरची भाषा सुरू केली आहे. आम्हाला तो नको. - अरुण मुनोत, मालक राजेंद्र मोटर्स

आयुक्त म्हणाले, कामाला लागा
टीडीआर की कॅश? याचा तोडगा आम्ही काढू. तुम्ही विस्तारीकरणाचे काम सुरू करा, असा विश्वास मनपा आयुक्तांनी दाखवल्याने जालना रोडच्या सहापदरीकरणाचे काम सप्टेंबरअखेर सुरू करणार. - यू. जे. चामरगोरे, प्रकल्प संचालक, एनएचआयए

टीडीआरमुळेच गती मंदावली...
जालनारोड ७० टक्के मोकळा करून दिला आहे. आता काही छोटी अतिक्रमणे राहिली. ती लवकरच काढू. मात्र, काही लोक टीडीआर ऐवजी नगदी मोबदला मागत आहेत. त्यामुळे हे काम मागे पडले. त्यावरही तोडगा निघेल. -रवींद्र निकम, उपायुक्त, मनपा.
बातम्या आणखी आहेत...