आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाला आली जाग, कटकट गेटच्या नाल्याची सफाई सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नऊ जून रोजी रात्री शहरात कोसळलेल्या अवकाळी पावसानंतर उशिरा का होईना महापालिकेला जाग आली. पावसाळ्यापूर्वी होणारे नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने ‘नालेसफाईकडे मनपाचे दुर्लक्ष’ या मथळ्याखाली 8 जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आयुक्त आणि महापौरांनी शहरातील नाल्यांची पाहणी करून तातडीने नाल्यांची सफाई करण्याचे आदेश दिले. यानुसार ठिकठिकाणचे नाले साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
पावसाळा तोंडावर येऊनही मनपाने नाल्याच्या सफाईकडे लक्ष दिले नव्हते. शहरातील बहुतांश नाले कचर्‍याने तुडुंब भरले आहेत. नाल्यातून पाणी वाहून जाण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने पावसाच्या पुराचे पाणी रस्त्यावर आणि आसपासच्या नागरिकांच्या घरात शिरण्याची भीती व्यक्त केली जात होती. वर्दळीचा रस्ता असणार्‍या कटकट गेट येथील नाल्याची सफाई झाली नव्हती. यामुळे नाल्यात मोठय़ा प्रमाणावर गाळ साचला होता. तसेच प्लास्टिकचा कचरा व गवत उगवल्याने पाणी वाहून जाण्यासाठी अगदी कमी जागा शिल्लक होती. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले होते. 10 जून रोजी आयुक्तांच्या पाहणीनंतर कटकट गेट येथील नाल्याच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले. या नाल्यातून शेकडो टन कचरा निघत असून तो ट्रॅक्टरद्वारे वाहून नेला जात आहे. तसेच काही कचरा रस्त्यावरच नाल्याच्या बाजूलाच टाकला आहे. तो ताबडतोब उचलून न्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे