औरंगाबाद- श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन क्षेत्र कचनेर येथे कालपासून सुरू झालेल्या वार्षिक यात्रा महोत्सवात सहभागी होत हजारो भाविकांनी मूलनायक भगवंतांचे दर्शन घेतले. या वेळी मुनीश्री सायंसागरजी महाराज, प्रसन्नचंद्र सागर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी भगवंताचा महामस्तकाभिषेक करण्यात आला. शांतिधारेचा मान सुनीलकुमार पाटणी परिवाराला मिळाला. इंद्र इंद्राणी होण्याचा मान ओमप्रकाश, सुरेंद्रकुमार, नरेंद्रकुमार पहाडे परिवाराला मिळाला. दुग्धाभिषेक नीलमकुमार पाटणी परिवाराने केला. प्रमोदकुमार कासलीवाल यांनी अर्चना फळ चढवले. उपस्थित मुनीवरांचे पादप्रक्षालन करण्याची संधी विवेकचंद जैन परिवाराला मिळाली. मनोजकुमार दगडा परिवाराच्या वतीने यात्राकाळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मस्तकाभिषेक औरंगाबाद येथील णमोकार भक्तिमंडळाच्या सुमधुर संगीताच्या साथीने झाला. आजच्या मुख्य सोहळ्यास खासदार चंद्रकांत खैरे, आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, संदिपान भुमरे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, नगरसेवक अनिल मकरिये, पैठण तालुका काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र काळे आदींची उपस्थिती होती. यात्रेच्या यशस्वितेसाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डी. यू. जैन, उपाध्यक्ष माणिकचंद गंगवाल, व्यवस्थापकीय संचालक सुरेश कासलीवाल, कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कासलीवाल आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करत आहेत.