आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायरान जमिनीवरून चुलत भावाचा गोळी झाडून खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - गायरान जमिनीच्या वहितीवरून चुलत भावाच्या छातीवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून जागीच मुडदा पाडला. त्याची बहीण घरात लपून बसल्याने तिचा जीव वाचला. ही थरारक घटना वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिरोडी शिवारात गुरुवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास घडली. शाहरुख कडू काळे (२१) असे मृत तरुणाचे नाव आहे. महानूर सुजमल काळे,अल्ताफ छगन भोसले रम्या ऊर्फ रमेश छगन भोसले तसेच रमेशची पत्नी (सर्व राहणार नागफणी बुद्रूक, नेवासा, जि.अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांचा आठ किमीपर्यंत पाठलाग केला. पण ते पसार झाले.
पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी सांगितले की, एमआयडीसीपासून १२ किमीवरील शिरोडी येथे पारधी समाजातील काळे कुटुंबीय अनेक वर्षांपासून शासकीय गायरान जमिनीवर वास्तव्यास आहे. गावालगतच्या कासोडा येथील १५ एकर गायरान जमिनीच्या वहितीवरून कडू काळे त्यांच्या पुतण्यांमध्ये अनेक वर्षांपासून वाद आहे. शाहरुखचा लहान भाऊ अमित (६ वर्षे)याचा मागील वर्षी तलावात बुडून संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला रमेश भोसले कारणीभूत असल्याची तक्रार अमितच्या आईने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडे केली होती. त्यामुळे रमेशच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू झाला होता. तर शेतीही हातून गेली होती. याचा राग मनात धरून रमेश ऊर्फ रम्या याने कडू यांच्या मोठ्या मुलाला ठार करण्याचा कट रचला.

पोलिसांच्या हातावर तुरी : मारेकरीमहानूर अल्ताफ एका दुचाकीवर तर रम्या त्याची पत्नी दुसऱ्या दुचाकीवर गंगापूरच्या दिशेने गेले. त्याच वेळी दुसऱ्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी गंगापूर मार्गावर असलेले पोलिस निरीक्षक डॉ.कांचनकुमार चाटे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल गायकवाड, दिलीप मगरे यांना घटनेची माहिती मिळाली. डॉ.चाटे यांनी आरोपी महानूर अल्ताफच्या दुचाकीचा भेंडाळा फाटा ते प्रवरासंगम, गंगापूर असा ते कि.मी. पर्यंत पाठलाग केला. अल्ताफच्या दुचाकीला एकदा पोलिसांच्या वाहनाची जोराची धडकही बसली. मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. रम्या त्याची पत्नी दुसऱ्या दुचाकीने गंगापूरच्या दिशेने पळाले.

१५ वर्षीय सुजाता बचावली
घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात शाहरुखची लहान बहीण सुजाता (१५) एकटीच होती. तिला मारण्यासाठी रम्या निघाला असता ती घरात लपून बसली. त्याच वेळी गोळीच्या आवाजामुळे गावकरी आवाजाच्या दिशेने येत असल्याचे मारेकऱ्यांनी पाहिल्यामुळे त्यांनी दुचाकीने पळ काढला. मारेकरी निघून जाताच सुजाताने गावाच्या दिशेने धाव घेत गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली.

अशी घडली घटना
गुरुवारी दुपारी शाहरुख त्याचे भाऊ बदाम, भय्या, जांभळ्या हे चौघे जनार्दन गुंडाळे यांच्या विहिरीत पोहून घराकडे निघाले होते. याच दरम्यान दोन दुचाकीवरून आलेल्या महानूर काळे,अल्ताफ छगन भोसले रमेश भोसले त्याच्या पत्नीने शहारुखला रस्त्यात अडवले. महानूरने त्याचे हात पकडले तर रम्याने छातीवर गोळी झाडली. लहान भाऊ बदाम काळेसह (११ वर्षे) इतर भावंडे शेताच्या दिशेने पळाले.

घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण
मृताच्या नातेवाइकांनी गावात गर्दी केल्यामुळे तणाव निर्माण झाला. वाळूज वाळूज एमआयडीसी पोलिसांचा फौजफाटा तैनात करावा लागला. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, डॉ. कांचनकुमार चाटे, धनंजय येरुळे, नाथा जाधव, शिवाजी कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...