आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिकारी बदलले, खुनांचे रहस्य मात्र उलगडेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अमितेशकुमार यांच्या रूपाने धडाडीचे पोलिस आयुक्त शहराला मिळाल्याने शहरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या खुनाचे रहस्य उलगडू शकते, असे अनेकांना वाटू लागले आहे. १९९८ मध्ये संपतमुनी यांचा खून झाला होता. त्यातील आरोपी नंतर निर्दोष सुटले. म्हणजेच पकडलेले खरे आरोपी नव्हते. तेव्हापासून ते गतवर्षातील अमिनाबीच्या खुनाचाही शोध पोलिसांना लागलेला नाही.
खुनाच्या घटना पोलिस रोखू शकत नाहीत. परंतु खून झाल्यानंतर खर्‍या आरोपींना गजाआड करण्याबरोबरच त्याची कारणे शोधणे हे काम पोलिसांनी केले तर जनतेचा पोलिसांवरील विश्वास वाढतो. परंतु औरंगाबाद शहरात तसे होताना दिसत नाही. राज्यभर गाजलेल्या खून खटल्यातील एक तर आरोपी सापडले नाहीत किंवा सापडलेले आरोपी न्यायालयात निर्दोष सुटले. म्हणजेच लोकांचा दबाव वाढल्यानंतर कोणाला तरी आत टाकून मोकळे व्हायचे अन् नंतर त्या आरोपींनी न्यायालयातून मोकळे व्हायचे, असा चोर-पोलिसांचा खेळ सुरू असल्याचे स्पष्ट होते.

वकील अकबर पटेल, संपतमुनी, श्रुती भागवत, मानसी देशपांडे ही प्रकरणे राज्यभर गाजली. परंतु त्यातील खर्‍या आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. अकबर पटेल, संपतमुनी मानसी देशपांडे हत्येप्रकरणी काही आरोपींना पकडण्यात आले होते. परंतु पुराव्याअभावी ते सुटले. श्रुती भागवत प्रकरणात तर पोलिसांना आरोपीही पकडता आले नाहीत. हे कमी म्हणून की काय, गतवर्षी पडेगाव येथे अमिनाबी या महिलेचा खून झाला. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी कोण हे पोलिसांना समजले; पण त्याला पकडता आले नाही. त्यासाठी शंभरावर पोलिस तैनात करण्यात आले होते. आरोपी काही सापडला नाही. त्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवे पोलिस आयुक्त यात लक्ष घालतील, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.

उलगडलेली प्रकरणे
१९९८-मुनी संपत महाराज- पकडलेले आरोपी निर्दोष सुटले. त्यामुळे खरे खुनी कोण, हा प्रश्न अजूनही तसाच.
२००४- अकबर पटेल- आरोपी निर्दोष ठरले. पुन्हा तोच प्रश्न.
२००९- मानसी देशपांडे- पकडलेल्या आरोपीविरुद्ध पुरावे नसल्याने तोही निर्दोष.
२०१०- श्रुती भागवत- आरोपीही सापडला नाही.
२०१४- अमिनाबी- आरोपीचे नाव कळले, सव्वाशे पोलिस लावूनही सापडत नाही.
बातम्या आणखी आहेत...