आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत दूध विक्रेत्याची गोळी घालून हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बीड बायपास रोडवरील बाळापूर शिवारातील दूध विक्रेत्याची मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पाठीत गोळी घालून हत्या करण्यात आली. अंकुश काशीनाथ खाडे (25) असे मृत युवकाचे नाव आहे. मात्र, हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

अंकुश मंगळवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास घरातून बाहेर पडला. दुचाकीवर तो जयभवानीनगरातील सराफा व्यापारी दिनेश दहिवाड यांच्याकडे आला. त्यांच्याकडून हातउसने पैसे घेतल्यानंतर तो निघून गेला. बीड बायपासवरून घराकडे जाताना त्याला काही युवकांनी रस्त्यात अडवले. गुरू लॉन्सजवळील मोकळय़ा जागेत त्याच्या पाठीच्या डावीकडे गावठी पिस्तुलाने अतिशय जवळून एक गोळी झाडण्यात आली. यानंतर मारेकर्‍यांनी त्याची दुचाकी (एमएच-20-बीबी-3595) आणि मोबाइल घेवून पळ काढला. अतिरक्तस्रावामुळे अंकुशचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गस्तीवर असलेल्या मुकुंदवाडी पोलिसांना त्याचा मृतदेह आढळला. ही माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अशोक गिरी सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अंकुशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत पाठवला. त्याच्या नातेवाइकांचा पोलिस रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. दरम्यान, बुधवारी दुपारी त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. यामध्ये गोळी झाडून हत्या केल्याचे प्राथमिक अहवालात नोंदवण्यात आले आहे. दुपारी पोलिसांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजकुमार पाडवी करत आहेत.

पत्नीशी झाले शेवटचे बोलणे
मारेकर्‍यांशी अंकुशची झटापट सुरू असताना त्याच्या पत्नीने मोबाइलवर संपर्क साधला होता. या वेळी मारेकरी जोरजोरात आरडाओरड करत होते. हा आवाज ऐकून अंकुशची पत्नी धास्तावून गेली होती. मात्र, अंकुशने नंतर फोन करतो, असे म्हणत तिचा फोन कापला. त्यानंतर मारेकर्‍यांनी अंकुशची हत्या करत त्याचा मोबाइलही पळवला.