आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसनवारीतून खून, पुरावा नष्ट करण्यासाठीच जाळला मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- खूनकरून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अर्धवट जळालेल्या त्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना अखेरीस मंगळवारी यश आले आहे. तो मृतदेह तालुक्यातील वळण येथील नवनाथ जाधव या २० वर्षीय तरुणाचा होता.

गावातीलच तिघांनी आर्थिक देवाणघेवाणीतून त्याचा प्रथम निर्घृण खून करून मृतदेह पेटवून दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील अन्य एक आरोपी फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहेत.

प्रदीप काकासाहेब चव्हाण (२०) उमेश भाऊसाहेब सूर्यवंशी (२०, दोघे रा. वळण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तालुक्यातील वळण येथील नवनाथ जाधव याने परिसरातील खिर्डी येथील कंपनीत कामाला असलेल्या एकाला काही दिवसांपूर्वी ४० हजार रुपये हातउसने दिले होते. वारंवार पैशांचा तगादा करूनही तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. यावरून त्या दोघांत वादही झाला होता. दरम्यान त्या व्यक्तीने गावातील प्रदीप चव्हाण उमेश सूर्यवंशी यांना सोबत घेत नवनाथचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी (१० जून) रात्री बिरोळा शिवारातील ओसाड अशा शेत गट क्र. ५८ मध्ये नवनाथला पैसे घेण्यासाठी बोलावले. त्या ठिकाणी या तिघांनी नवनाथ याचा निर्घृणपणे खून केला नंतर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तो पेटवून दिला. तालुक्यातील बिरोळा शिवारात ११ जून रोजी शेताच्या बांधावर एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा मृतदेह इतका निष्ठुरपणे जाळण्यात आला होता की हा पुरुष आहे की स्त्री हे ओळखणेही कठीण झाले होते. त्याच्या अंगावरील कपड्याचा तुकडाही शिल्लक ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे प्रथम मृतदेहाची ओळख पटवणे नंतर खुनाचे कारण शोधणे हे दुहेरी आव्हान शिऊर पोलिसांसमोर होते. घटनास्थळी कोणताच पुरावा मिळून आल्याने पोलिसांची तपासाची गती जागेवरच अडकली होती. शिऊर पोलिस ठाण्याचे धनंजय फराटे यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता त्या ठिकाणी शर्टाची काही बटणे आढळून आली. तर याच परिसरातील वळण येथील नवनाथ जाधव याने घातलेल्या शर्टाचे वर्णनावरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी तो ट्रकचालक असल्याचे सांगत बाहेरगावी गेल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांचे समाधान झाल्याने त्यांनी अधिकची माहिती घेतली असता हा मृतदेह त्याचाच असल्याचे निष्पन्न झाले.

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह चौकाजवळ आढळला
फुलंब्री- पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौका गावच्या रस्त्यालगतच शेतात ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सोमवारी आढळून आला. फुलंब्री पोलिस ठाण्याचे व्ही.आर.पडूळ यांना माहिती मिळाली असता ते घटनास्थळी दाखल झाले. अंगात शर्ट नसून पांढऱ्या रंगाची पँट आहे. यासंदर्भात कुणाला काही माहिती असल्यास फुलंब्री पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.