आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन मध्यरात्री घरात घुसून बँक व्यवस्थापकाची हत्या, धारदार शस्त्राने चिरला गळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साताऱ्यातील याच इमारतीत खून झाला. इन्सेटमध्ये जितेंद्र होळकर. - Divya Marathi
साताऱ्यातील याच इमारतीत खून झाला. इन्सेटमध्ये जितेंद्र होळकर.
औरंगाबाद- सातारा परिसरातील छत्रपतीनगरात राहणारे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेकटा शाखेचे व्यवस्थापक जितेंद्र नारायण होळकर (४७) यांचा गळा चिरून खून करण्यात आला. शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. अवघ्या १७ मिनिटांत खून करून मारेकऱ्यांनी पळ काढल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. खून झाला तेव्हा जितेंद्र यांची पत्नी नववीत शिकणारा मुलगा घरातील दुसऱ्या खोलीत झोपले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळकर हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पैठण तालुक्यातील शेकटा शाखेत व्यवस्थापक, तर त्यांची पत्नी भाग्यश्री या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कनिष्ठ अधिकारी आहेत. मुलगा यश इयत्ता नववीत आणि मुलगी साक्षी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून ती सध्या संगमनेरला आहे. शुक्रवारी रात्री रोजच्याप्रमाणे होळकर कुटुंबीय टीव्ही पाहत बसले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास मुलगा यश त्याच्या खोलीत अभ्यासासाठी गेला. त्याच्यापाठोपाठ भाग्यश्रीही यशच्या खोलीत गेल्या, तर जितेंद्र हे वेगळ्या खोलीत झोपले होते. रात्री एकच्या सुमारास काहीतरी आवाज आल्याने भाग्यश्री यांना जाग आली. जितेंद्र हे पाणी पिण्यासाठी उठले असतील, असे त्यांना वाटले. मात्र काही वेळाने मोठा आवाज येऊ लागला. गोंधळ सुरू झाला जोरजोरात आरडाओरड सुरू झाली. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवाजाची कडी बाहेरून लावली होती. त्यांनी आरडाओरड केली. अखेर त्यांनी शेजारच्या पाठक यांना फोन लावला. त्यांनी इतर शेजाऱ्यांना उठवले आणि होळकर यांच्या घरात प्रवेश केला तेव्हा घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडेच होते. त्यांनी यशच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि मायलेकांची सुटका केली. त्यानंतर भाग्यश्री शेजाऱ्यांनी दुसऱ्या बेडरूमकडे धाव घेतली तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जितेंद्र त्यांना दिसले. त्यांचा गळा चिरलेला होता. उजव्या हातावरही वार झाले होते. वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून मुलगा यशला अक्षरश: कापरे भरले. शेजारील महिलांनी त्यांना सावरले. शेजाऱ्यांनी तत्काळ ही बाब १०० नंबरवर कळवली. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत जितेंद्र यांना उपचारासाठी घाटीत नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सातारा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. गळा चिरल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. जवळच्या व्यक्तींचे जवाब नोंदवल्यानंतर नेमकी पार्श्वभूमी स्पष्ट होईल, असे पोलिस निरीक्षक भारत काकडे यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक सुशीला खरात पुढील तपास करीत आहेत. हा प्रकार गांभीर्याने घेण्यात आल्याचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले. 

पोलिस आयुक्तांची घटनास्थळाला भेट 
पोलिसआयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त राहुल श्रीरामे, सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भारत काकडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसेतज्ज्ञांना श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दुचाकी, दोघांच्या संशयास्पद हालचाली 
रात्री एकच्या सुमारास छत्रपतीनगरमध्ये ही घटना घडली त्या गल्लीत एका दुचाकीवर दोन व्यक्ती चक्कर मारताना सीसीटीव्हीत दिसून आल्या. हा सीसीटीव्ही त्यांच्या घरापासून किमान १०० मीटर अंतरावर आहे. त्यानंतर काही मिनिटांतच होळकर यांच्या घरासमोर एका गाडीच्या हेडलाइट्सचा प्रकाश दिसला. ती गाडी त्याच ठिकाणी थांबली. त्यानंतर बरोबर १७ मिनिटांनी गाडीचे हेडलाइट्स पुन्हा एकादा चमकल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहेत. त्यामुळे अवघ्या १७ मिनिटांत मारेकऱ्यांनी खून करून पळ काढल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस पोहोचले आहेत. 

खून नेमका कशामुळे? बँकेत वाद, जमिनीचा तंटा की आणखी काही? 
जितेंद्र यांचा खून का करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरात पत्नी असताना मारेकऱ्यांनी धाडस केले आणि पळ काढला. आता पोलिस तीन शक्यतांवर लक्ष केंद्रित करून खुनाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या शक्यता अशा : 
- जितेंद्र यांचे बँकेत कोणाशी वाद होते का? या खुनाचा त्या वादांशी काही संबंध आहे? 
- होळकर यांना त्यांच्या काकाने दत्तक घेतले होते. त्यांना मोठ्या प्रमाणावर वडिलोपार्जित जमीनही होती. याचा या खुनाशी काही संबंध आहे का? 
- या दोन कारणांव्यतिरिक्त तिसऱ्याही एका शक्यतेची पोलिस पडताळणी करत आहेत. ती म्हणजे काही अनैतिक संबंधातून हा प्रकार घडलेला आहे का? 
- होळकर यांच्या हातातील सोन्याच्या चार अंगठ्या, घरातील सोन्या-चांदीचे दागिने रोख ५० हजार इतर वस्तू जशास तशा आहेत. म्हणजेच चोरीच्या हेतूने हा खून झाला नाही. मग खुनाचा हेतू कोणता? 

यशचा पोलिसांकडे आग्रह: अंकल, माझ्या पप्पांच्या मारेकऱ्यांना पकडाल ना? 
नववीत शिकणारा यश या घटनेमुळे कमालीचा भेदरला. त्याला शेजाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांनी धीर दिला तेव्हा तो सावरला. पोलिसांनी त्याच्याशी चर्चा केली तेव्हा माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना तुम्ही पकडाल ना? मला प्रॉमिस द्या, त्यांना तुम्ही नक्की अटक करा, असे तो पोलिसांना म्हणत रडू लागला. हे पाहून पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्यातही क्षणभर पाणी तरळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

पोलिसही बुचकळ्यात: मुख्यप्रवेशद्वारातून पळाले, परंतु घरात शिरले कसे? 
होळकर यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. या मजल्यावरून थेट घरात प्रवेश करता येतो. मुख्य प्रवेशद्वाराचे कडीकोयंडे शाबूत आहेत. त्यामुळे मारेकऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वारातून पळ काढला, मात्र त्यांनी घराच्या नेमक्या कुठल्या भागातून प्रवेश मिळवला हे अजून स्पष्ट नाही. दरम्यान, महिनाभरापूर्वी अशाच प्रकारे घरात कोणीतरी शिरल्याची तक्रार या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केल्याची चर्चा या भागात आहे. 
बातम्या आणखी आहेत...