आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरांमधून आनंद वाटणारे ज्येष्ठ बासरीवादक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपावली हा सण आनंदाचा. आनंदाचे अनेक प्रकार असू शकतात. निवृत्त तहसीलदार बाबूराव दुधगावकर यांना दिवाळीचा हा आनंद इतरांच्या चेहर्‍यावर आनंदाची उधळण करून मिळतो. यासाठी ते वेळ मिळेल तेव्हा एखाद्या कार्यक्रमात मोफत बासरीवादन करतात. गेल्या 60 वर्षांपासून त्यांची ही संगीतसेवा सुरू आहे. एकलव्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाला गुरू मानून त्यांनी ही कला अवगत केली. राज्यात ठिकठिकाणी अखंड दोन तास बासरीवादन करताना ते मानधन वा प्रवास खर्चही घेत नाहीत.

मूळ परभणीचे असणारे दुधगावकर प्रदीर्घ सेवेनंतर 1994 मध्ये तससीलदार पदावरून निवृत्त झाले. 5 नोव्हेंबर रोजी ते 78 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. शासकीय नोकरीत काम करतानाही त्यांच्या संवेदनशील मनात एक कलाकार कायम जागा होता. मुळात या कलावृत्तीची रुजवण बालवयातच त्यांच्यात झाली. वयाप्रमाणे ही कलावृत्ती अधिक तयार होत गेली.

एकलव्याप्रमाणे केली अखंड आराधना
तो काळ रेडिओचा होता. त्यावर बासरीवादनाचे कार्यक्रम होत असत. नववीच्या वर्गात असताना बाबूराव यांना या बासरीने मोहिनी घातली. त्याकाळी खास बासरीवादन शिकवणारे वर्गही नसत. यामुळे त्यांनी र्शीकृष्णाचा फोटो समोर ठेवून स्वत: सराव सुरू केला. हळूहळू बासरीतून अपेक्षित सूर निघू लागले. मग त्यांनी या कलेचे सादरीकरण सुरू केले. शाळेच्या कार्यक्रमात, गणेशोत्सवात ते बासरीवादन करू लागले. यातून त्यांचा आत्मविश्वास बळावला. काही तज्ज्ञांनी सुचवलेल्या दुरुस्त्या करून ते या कलेत अधिक पारंगत झाले.

निवृत्तीनंतर नवीन सुरुवात
निवृत्तीनंतर काय करावे, असा प्रश्‍न सर्वांनाच पडतो, पण दुधगावकर यांनी निवृत्तीनंतरचे आयुष्य या कलेसाठी सर्मपित केले आहे. 1994 नंतरच त्यांच्या कलेला खर्‍या अर्थाने बहर आला. त्यांनी बासरीवादनाचे कार्यक्रम सुरू केले. मुंबई, औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, शेगाव, खामगाव, नाशिक, पंढरपूर आदी शहरांत त्यांनी बासरीवादन केले आहे. वेरूळ-औरंगाबाद महोत्सवात त्यांचा सादरीकरणासाठी विशेष सत्कार करण्यात आला, तर महाराष्ट्र गौरव समितीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना संगीतरत्न पुरस्कार प्रदान केला. परभणी आकाशवाणीवर दर मंगळवारी प्रस्तूत होणार्‍या बालसभेची धून दुधगावकर यांनी तयार केली आहे. शनिवारी ज्योतीनगर येथील कवितेच्या बागेत दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमात बासरीवादन करून उपस्थितांना दिवाळीची संगीतमय मेजवानी दिली.

बासरीमुळेच प्रकृती ठणठणीत
ते अखंड दोन तास बासरी वाजवतात. यात शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, स्वागतगीत आणि मराठी सुगम संगीताचा समावेश असतो. हिंदी चित्रपट गीतांना ते आपल्या सादरीकरणात फार स्थान देत नाहीत. बासरीवादनामुळे त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांना श्वास लागत नाही. दातही मजबूत आहेत. कार्यक्रमासाठी ते मानधन, प्रवास खर्चही घेत नाहीत. रसिकांच्या टाळ्या हेच आपले मानधन असल्याचे ते सांगतात.