आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्यार काळजात घुसली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वरझंकार संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस रसिकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरला. स्वरविभूती आशाताई अन् प्रतिभावान युवा वादक नीलाद्रीकुमार यांनी अशी काही जादूगिरी केली की इंद्रसभेत असल्याची अनुभूती प्रत्येक उपस्थिताला आली. आशाताईंचे रागदारीतील हुकूमतीचे स्वर अन् नीलाद्री यांचे प्रत्येक तारेवरील प्रभुत्व पाहताना कट्यार काळजात घुसल्याचा अनुभव आला. स्वरक्षणांचे साक्षीदार होतानाच रसिक श्रोत्यांना अंतरीच्या अनाहत नादाची झलक मिळाली. स्वरमंचावरून बरसणारा स्वरांचा अखंड झरा दुष्काळातही सर्वांना चिंब करणारा ठरला. 'दिव्य मराठी'च्या वतीने आयोजित प्रोझोन लॉनवर झालेल्या या कार्यक्रमाचे रसग्रहण खास "दिव्य मराठी'च्या वाचकांसाठी सरस्वती भुवन कला वाणिज्य महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख डॉ. संजय मोहड यांनी केले आहे. ते त्यांच्याच शब्दांत :
आरंभापासूनच झंकारत जाणाऱ्या स्वरझंकार संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांच्या पूर्वाकल्याणच्या अपूर्वाईचा परिचय देणारा होता. किराणा, ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या गायकीचा वारसा असलेल्या आशाताईंचा प्रत्येक स्वर समृद्ध होता. त्यांनी राग पूर्वाकल्याणने गायनास प्रारंभ केला. ‘अब तो मोरी लाज तुमरे हात मोरे गुणीदास’ या विलंबित बंदिशीने त्यांनी रसिकांवर गारूड करण्यास सुरुवात केली. खडा, पेचदार आणि घुमारेदार आवाज अन् नजाकतीने आवर्तन भरण्याची त्यांची शैली हृदयात घर करणारी होती. द्रुत एकतालातील ‘मैं तो आई तोरे द्वार परवरदिगार’ ही रचना भक्तीची आर्त हाक घालणारी होती. त्यांच्या गायनात किराणा घराण्याचा धीरोदात्तपणा, ग्वाल्हेर घराण्याची व्यापकता अन् आग्रा घराण्याची चपळता स्पष्टपणे जाणवत होती. त्यांच्या याच शैलीने त्यांनी आजवर रसिकमनावर अधिराज्य गाजवले असल्याचा परिचयही आज औरंगाबादकर रसिकांना आला. पं. बाळकृष्णबुवा मोहिते, गानहिरा हिराबाई बडोदेकर, पं. भीमसेन जोशी, विदुषी माणिक वर्मा, पं. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी यासारख्या प्रतिभावान गुरूंकडून तालीम लाभलेल्या आशाताई आपल्या चतुरस्र गायकीची जादू क्षणोक्षणी दाखवत होत्या. मैफलीला पुढे नेताना त्यांनी राग दुर्गा विलक्षण नजाकतीने पेश केला. ‘लाडला ब्रज में कन्हैया, होरी खेलन नंदलाल गोपियन संग रास रचावे’ ही रूपक तालातील अन् ‘शुभ दिन आयो मन बावरी तोरे’ ही तीनतालातील बंदिश मन चिरतरुण करणारी ठरली. भक्ती अन् प्रेमरसातील या बंदिशी मनाला भारून टाकणाऱ्या होत्या.

गानमैफलीला शेवटाकडे नेताना राग ‘काफी’तील सोळा मात्रात बांधलेला टप्पा त्यांच्या बहुआयामी गायकीचा परिचय देत होता. टप्पा गानशैलीला अनुकूल असलेली चंचलता आशाताईंच्या साधनेने तंतोतंत धारण केली होती. याच रागातील द्रुत तीनतालातील ‘मानो ना मानो मोरी सैंया’ ही बंदिश आणि ‘तदियन दिम तनतननन’ या तराण्याने त्यांच्या मैफलीची आस्वादकता निश्चितपणे वाढवली. मधाळ स्वरांच्या आशाताईंच्या गायनाला आनंदवर्धक आणि रसपरिपोषक अशी संवादिनी साथ सुयोग कुंडलकर यांनी केली, तर तबल्यावर नीलेश रणदिवे यांनी समर्पक साथ केली. भाविका दाशरथे हिने तानपुऱ्यावर तर मानसी कुलकर्णीने सुरेख स्वरसाथ केली.
राग 'हेमंत’ची दिव्यानुभूती
नवतेचा ध्यास असलेल्या सतारवादक नीलाद्रीकुमार यांनी उत्तरार्धात स्वरमंचाचा ताबा घेतला. सतारवादनातील सूर्य म्हणून ज्यांना जगाने गौरवले त्या पं. रविशंकर यांची तालीम लाभलेले पं. कार्तिककुमार यांचे नीलाद्री हे शिष्य आणि सुपुत्रसुद्धा नीलाद्रीकुमार यांनी वादनाची सुरुवात राग ‘हेमंत’ने केली. आलाप, जोड, झाला यातून त्यांनी दिव्यानुभूतीचे दर्शन रसिकांना घडवले. स्वरांतील विलक्षण अवकाश हे नीलाद्री यांच्या सतारीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विलक्षण अवकाश आणि अनुनाद यामुळे त्यांची सतार ही खरोखरच ‘गाणारी सतार’ वाटत होती. राग मांज खमाजमध्ये मांड पहाडी आणि खमाज या रागांचे मिश्रण विलक्षणरीत्या बांधले होते. उस्ताद बाबा अल्लाउद्दीन खान यांची रचना रूपक तालात सादर केली. यानंतर लगेचच द्रुत तीनतालात त्यांनी एक वैभवशाली रचना सादर करत रसिकमनाचा ताबा घेतला. सतारवादनातील सूर्य संगीत अवकाशात सदैव तळपत राहील यांची साक्ष नीलाद्रीकुमारांच्या वादनातून रसिकांना पटत होती. पद्मश्री विजय घाटे यांच्या तबला साथीने मैफलीची उत्सुकता शिगेला पोहोचली. या स्वरमयी संध्येला निवेदनाच्या उत्तम स्वरांत गुंफण्याचे काम वीणा गोखले यांनी केले.