आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Couple Marrage In Shivsena Marriage Ceremony

शिवसेनेच्या विवाह सोहळ्यात मुस्लिम जोडप्यांचा निकाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची लग्ने लावण्यात सरसावलेल्या शिवसेनेने सहिष्णुतेचा नवा आदर्श समोर ठेवला आहे. जिल्ह्यातील २४४ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा येत्या शनिवारी रेल्वेस्टेशन रस्त्यावरील अयोध्यानगरीत होणार असून यात मुस्लिम जोडप्यांचाही निकाह लावला जाईल. २४४ जोडप्यांमध्ये १९४ हिंदू, तर ४२ बौद्ध वधू-वर आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न लावून देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार स्थानिक पदाधिकारी कामाला लागले होते. प्रारंभी सामूहिक सोहळ्यात विवाह करण्यास शेतकरी राजी नसल्याचे समोर आले. जनजागृती झाल्यानंतर हा आकडा २४४ पर्यंत पोहोचला. विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून खासदार, आमदार तसेच अन्य सर्व पदाधिकारी अयोध्यानगरी मैदानावर तळ ठोकून आहेत. वधू-वरांना कपडे, मंगळसूत्रापासून ते ७६ प्रकारच्या संसारोपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत. एका जोडप्यासाठी शिवसेनेकडून सरासरी एक लाख रुपये इतका खर्च करण्यात येत आहे. वेगवेगळ्या धर्मांची जोडपी असल्याने त्यांना विवाहबद्ध करण्यासाठी भटजी, मौलवी तसेच भन्तेजींची उपस्थिती असणार आहे.
मुस्लिम शेतकऱ्यांनीही या विवाह सोहळ्यात नोंदणी केल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. यावर बोलताना खासदार खैरे म्हणाले, शिवसेनेत जात-पात पाळली जात नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाती-पातीला थारा दिला नव्हता. आम्हीही देत नाही. संकटात सापडलेला शेतकरी, एवढ्या एकाच अंगाने आम्ही याकडे पाहतो. भविष्यातही आम्ही शेतकऱ्यांना अशीच मदत करण्याचा प्रयत्न करू.

पत्रकार परिषदेस सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, शहरप्रमुख राजू वैद्य, नगरसेवक नंदकुमार घोडेले आदी उपस्थित होते.

फटाक्यांना बंदी
लग्न लागल्यानंतर आतषबाजी करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. परंतु या पद्धतीला येथे फाटा देण्यात येणार आहे. आग लागण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर संयोजकांनी हा निर्णय घेतला आहे.

५० हजार वऱ्हाडींच्या जेवणाची व्यवस्था
एका जोडप्या समवेत किमान १०० वऱ्हाडी असतील, असे संयोजकांना अपेक्षित आहे. परंतु ही संख्या वाढू शकते. त्यामुळे येथे ५० हजार वऱ्हाडींच्या जेवणाची तयारी करण्यात येत आहे. मोठी गर्दी होणार तसेच राज्यपाल स्वत: येणार असल्याने पोलिस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी निधी पांडे, पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अयोध्यानगरीची पाहणी केली.