आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारीख निश्चिती करतानाच ते झाले चतुर्भुज!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लग्न म्हटले की बँडबाजा, पंगती, महागडे कपडे, लग्नपत्रिका या सर्व गोष्टींवर हिंदू-मुस्लिमांसह इतरही समाजांत मोठा खर्च केला जातो. मुलगी बघण्यासाठी आले अन् लग्न उरकून गेले, असे प्रसंग समाजात बरेचदा घडत असतात; परंतु मुस्लिम समाजात मात्र अशा घटना अगदीच तुरळक दिसतात. जुना बाजार आणि हर्षनगरातील दोन कुटुंबीय आपल्या मुलामुलीच्या "निकाह'ची (लग्न) तारीख घेण्यासाठी जमले. कोणती तारीख सोयीची ठरेल, यावर विचार सुरू असतानाच तारखेऐवजी लग्नच उरकण्याचा प्रस्ताव समोर आला आणि नियोजित वधू-वरांचे याच बैठकीत लग्न उरकले. या लग्नामुळे मुस्लिम समाजाचाही साध्या पद्धतीने लग्न करण्याकडे कल दिसून येत आहे.

जुना बाजार येथील रहिवासी शेख नजीर यांची मुलगी मुमताज जहाँ हिने मौलाना आझाद महाविद्यालयातून बीएडचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शेख नजीर यांनी तिच्यासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली. हर्षनगर येथील मोहंमद हफिजोद्दीन यांचा एकुलता एक मुलगा मोहंमद सिराजोद्दीन याच्याशी लग्न करण्याचे ठरले. मोहंमद सिराजोद्दीन याने डी. फार्मचे शिक्षण पूर्ण केले आहे. १३ सप्टेंबर रोजी मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला आणि सिराजोद्दीनला मुमताज पसंत पडली. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी वाजता दोन्ही कुटुंबांकडील मंडळींची लग्नाची तारीख काढण्यासाठी जुना बाजार येथे मुलीच्या घरी बैठक बसली. वराकडील मंडळींनी डिसेंबर तर वधूकडील मंडळींनी जानेवारीत तारीख काढण्याचा आग्रह धरला. तारखेवर चर्चा सुरू असतानाच वराचे वडील हफिजोद्दीन यांनी आजच लग्न उरकून घेऊ, असे सांगताच सगळेच आर्श्चचकित झाले. हो, आजच सात वाजता लग्न उरकू, असा थेट प्रस्ताव त्यांनी मांडला. शिवाय आम्हाला ना कपडे हवेत ना दागिने, असेही सांगून टाकल्याने वधूकडील मंडळींना आश्चर्याचा दुसरा धक्का बसला आणि हा प्रस्ताव 'बहुमता'ने मंजूर झाला.
लग्नामध्ये नवरदेव- नवरीला कोणतेही हारतुरे आणि वधूला दागदागिने देण्यात आले नाहीत. ना पंगती बसल्या ना बँडबाजा होता. मुमताज जहाँ आणि मोहंमद सिराजोद्दीन यांचा विवाह अगदी साध्या पद्धतीने ४० ते ५० लोकांच्या उपस्थित हिनानगर रशीदपुरा येथील अबुबकर मशिदीत आरिफ मौलाना यांनी लावून दिला.