आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तिप्रदर्शनासह घडवले शिस्तीचे दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजालाही नोकरी तसेच शिक्षणात १५ टक्के आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी औरंगाबादेत शुक्रवारी काढण्यात आलेला मोर्चा शहरात यापूर्वी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा तसेच बहुजन क्रांती मोर्चाप्रमाणेच ऐतिहासिक ठरला. यापूर्वी या समाजाचा इतका विशाल मोर्चा शहरात कधीच निघाला नव्हता. मराठा समाजाच्या मोर्चाप्रमाणे मुस्लिमांनीही या मोर्चात शक्तिप्रदर्शनासह शिस्तीचे दर्शन घडवले. मुस्लिम समाजाचा हा राज्यातील नववा तर मराठवाड्यातील सहावा (संख्येच्या दृष्टीने पहिला विक्रमी) मोर्चा होता. आमखास मैदान ते विभागीय आयुक्तालय असा मोर्चाचा मार्ग असला तरी मुस्लिम बांधव शहराच्या चारही भागांनी चालत मोर्चास्थळी आले. त्यात महिलाची संख्याही उल्लेखनीय होती. तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता. सायंकाळी पाच वाजता मुला-मुलींनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. मोर्चामुळे काही रस्ते बंद केले होते. 
 
निवेदन मराठीत : मोर्चा संपल्यानंतर मोहंमद माझ, अदनान इलियास किरमाणी, आयना खान, रवीशा नासेर नाहदी आणि जैनब अब्दुल रऊफ या लहान मुलांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना अस्खलित मराठीत निवेदन दिले; परंतु या मुलांनी भापकरांशी मात्र इंग्रजीमध्ये संवाद साधला. 

महाराष्ट्रात मराठा समाजासह मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याचे तत्त्वत: मान्य करण्यात आले आहे. तथापि हे आरक्षण पुढे कायम सुरू ठेवण्यासाठी मराठा समाजालादेखील आरक्षण कायम ठेवण्यासाठी प्रयत्नची पराकाष्ठा करावी लागत आहे. 

ज्या युवकांना न्यायालयाने आरोपातून निर्दोष सोडले आहे, त्यांना भरपाई देण्यात यावी. ज्या एजन्सीने गुन्हा दाखल केला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. 
मुस्लिम समुदायाचा धार्मिक प्रचार करणाऱ्या धार्मिक संघटनांवर विनाचौकशी किंवा न्यायालयाच्या आदेशाशिवाय होणारी बंदीचा कारवाई तसेच बदनामी त्वरीत थांबवावी. 
आर्थिक, शैक्षणिक सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी मुस्लिम समाजाला किमान १५ टक्के आरक्षण देण्यात यावे. 

शरियतमध्ये हस्तक्षेप नको 
अतिरेकी कारवाया करणाऱ्यांना मग ते कोणतेही जाती-धर्माचे असो त्यांना अत्यंत कठोर शिक्षा व्हावी. परंतु निरपराध तरुणांना चौकशीच्या नावाखाली त्रास देऊ नये. 
वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे संरक्षण करावे. धनदांडग्यांनी केलेली अतिक्रमणे हटवावी. तसेच बोर्डातील राजकीय ढवळाढवळ बंद करून त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात यावी. 

गर्दीतून रुग्णवाहिकेला वाट 
दिल्लीगेट येथून रस्ता पुढे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दुपारी वाजेच्या सुमारास सिल्लोडकडून एक रुग्णवाहिका आली. तेव्हा स्वयंसेवकांनी एवढ्या प्रचंड गर्दीतून रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला. 

३५० विद्यार्थ्यांना तिरंगा फेटा 
यामोर्चात सहभागी झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या साडेतीनशेवर विद्यार्थांनी डोक्यावर तिरंगा फेटा परिधान केला होता. भर गर्दीत या विद्यार्थ्यांचा ग्रुप लक्ष वेधून घेत होता. दुसरीकडे वकील मंडळीही काळा कोट परिधान करून सहभागी होती. 

संयोजक : इलियासकिरमाणी, शेख मसूद, खालेद सैफोद्दीन, शोएब खुसरो, नायब अन्यारी, अबू बकर रहेबर, सलीम सिद्दिकी, नासेर सिद्दिकी, मोहंमद अब्दुल रऊफ, ख्वाजा शरफोद्दीन, जमीर कादरी, डॉ. अब्दुल कदीर, शारेक नक्षबंदी, नासेर नाहदी चाऊस, अब्दुल वाजेद कादरी, डॉ. शमीम रजवी, सय्यद अक्रम, साजेद पटेल, रमजानी खान, सय्यद खलिउल्ला हुसेनी, सोहेल झकियोद्दीन, शेख मुक्तार, मोहंमद रफतुल्ला खान, मोबीन अन्सारी, सय्यद अफजल हुसेन, जफर खान पठाण, 

मोर्चादीड वाजता सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले असले तरी मोर्चेकरी एक वाजेपासूनच आमखास मैदानावर जमा होण्यास सुरुवात झाली. 

शहराच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक मोर्चात सहभागी होण्यासाठी पायी निघत होते. पायी येणाऱ्यांसाठी जागोजागी पाणी, बिस्किटाची व्यवस्था होती. 

मौलाना महेफुजउर्र रहेमान यांच्या कुराण पठणाने मोर्चाला सुरवात झाली. मौलाना अमिरोद्दीन यांनी सर्वांसाठी दुवा केली. 

काहींनी विविधरंगी झेंडे आणले होते. परंतु फक्त तिरंगा आणि हिरवाच झेंडा फडकवा. वादग्रस्त घोषणांची पोस्टर्स चालणार नाहीत, असे संयोजकांनी जाहीर केले. मोर्चात काही निळे झेंडेही फडकत होते. 

चार मुलांनी इंग्रजी तसेच उर्दूतून भाषण केले. शाहीन शेख या विद्यार्थिनीने मराठीतून भाषण केले. त्याला टाळ्यांची दाद मिळाली. राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. 
 
 
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वयंसेवक : मोर्चाच्यामार्गावर, शहरात वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी स्वयंसेवक धावून येत होते. पोलिसांच्या मदतीची त्यांनी गरज भासू दिली नाही. कधी मोर्चेकऱ्यांना जाऊ देण्यासाठी ते वाहने थांबवत होते तर कधी मोर्चेकऱ्यांना थांबवून वाहनांना रस्ता ओलांडू दिला जात होता. 
बातम्या आणखी आहेत...