आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम साहित्याची वेगळी चूल नको; यु.म.पठाण यांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मुस्लिम समाज भारतीय संस्कृतीचाच एक घटक आहे. मुस्लिम साहित्य आणि साहित्यिकांचे समाजाच्या जडणघडणीत आणि विकासामध्ये मोठे योगदान आहे. त्यामुळे मुस्लिम साहित्याची वेगळी चूल नको, असे असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यु. म. पठाण यांनी मांडले.

शुक्रवारी मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला महाविद्यालय बिडकीन यांच्या वतीने (मुस्लिम साहित्यिकांचे मराठी साहित्याला योगदान आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील भारतीय मुस्लिम समाजाचे स्थान) दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे होते. आमदार एम. एम. शेख, माजी खासदार उत्तमसिंह पवार, विनायक बोरसे, डॉ. शिवाजी कदम, डॉ. भारत हंडीबाग, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. तसनीम पटेल, डॉ. सदाशिव सरकटे, हारून अमर जिलानी, तकी अहेमद काजी, आत्माराम बोर्डे, शेख अब्बास शेख लाल, डॉ. शेख इकबाल मिन्ने, डॉ. सतीश बडवे यांची उपस्थिती होती.

डॉ. पठाण म्हणाले, ज्याप्रमाणे मराठी, दलित आणि हिंदी साहित्य आहे. तसेच मुस्लिम साहित्यदेखील प्रतिष्ठित आहे. मात्र, त्याची दखल कोणी घेत नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनातही कधी मुस्लिम साहित्यावर चर्चा झाली होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, मुस्लिम समाजदेखील निष्ठावंत आहे. ज्याप्रमाणे सुफी संतांवर मराठीतील संत एकनाथ, संत रामदास यांचा प्रभाव होता. त्याचप्रमाणे मराठी संतांवरही सुफी संतांचा प्रभाव राहिला आहे. सुफी संतांनी कधीही धर्मांतर करा, असे सांगितलेले नाही.

डॉ. पांढरीपांडे म्हणाले, कोणत्याही प्रकारच्या साहित्याचे कप्पे करणे योग्य नाही. याचे कारण साहित्याला कोणतीही जात किंवा धर्म नसते. ते एकसंघ असावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आमदार शेख म्हणाले, मराठी भाषा ही फक्त मराठी माणसाचीच नाही तर ती संपूर्ण महाराष्ट्राची आहे. प्रत्येकाचे तिच्यावर प्रभुत्व असायला हवे. तसेच मराठी भाषेचा अभिमानही प्रत्येकाने बाळगायला हवा.