आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यात मंडपासाठी आता घ्यावी लागणार परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गणेशोत्सवातरस्त्यावर मंडप टाकण्यासाठी आता परवानगी घ्यावी लागणार असून परवानगीचा फलक मंडपाच्या दर्शनी भागात लावावा लागणार आहे. याची खातरजमा करण्यासाठी पाच जणांचे पथक तयार करण्यात आल्याचे अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंडप तसेच ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळण्यासंदर्भात या वेळी माहिती देण्यात आली.
समारंभ तसेच उत्सवाच्या प्रसंगी रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या मंडपासंदर्भात ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमनाबाबत डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर १३ मार्च २०१५ आणि २४ जून २०१५ ला उच्च न्यायालयाने याबाबत आदेश दिले. त्याचे पालन प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. मनपाचेअधिकारी गैरहजर : शासनाच्यावतीने नियमांची माहिती व्हावी यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, सहायक पोलिस आयुक्त रमेश गायकवाड आणि पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील लांजेवार यांची उपस्थिती होती. मात्र, ज्या मनपाच्या वतीने सारी यंत्रणा राबवण्यात येणार आहे, त्या मनपाचे अधिकारी मात्र गैरहजर होते. मनपा आयुक्तांना याबाबत पत्र देण्यात आले होते. मात्र, मनपाचा कोणीही अधिकारी हजर नव्हता.
डेसिबल मोजण्यासाठी फक्त सहा यंत्रे
मनपाक्षेत्रात ४२ शांतता क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये शैक्षणिक क्षेत्र, दवाखाने इत्यादींचा समावेश आहे. शहरात जवळपास ८५० पेक्षा अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. मात्र ध्वनिप्रदूषण तपासण्याची, किती डेसिबलचा आवाज आहे हे मोजण्याची केवळ यंत्रे पोलिस प्रशासनाकडे आहेत. त्यामुळे वाढीव यंत्रे मिळवण्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त रमेश गायकवाड यांनी दिली. यामध्ये दिवसा रेसिडेन्सी विभागात ५५ कमर्शियल ६५, उद्योग ७५ पेक्षा जास्त डेसिबल आवाज असल्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे डी. जे.च्या आवाजाने मर्यादाभंग केल्यास त्यावरदेखील कारवाई करण्यात येणार आहे.

आयुक्तांकडून घ्यावी लागणार परवानगी
सोरमारेयांनी सांगितले, मनपा क्षेत्रात मंडप उभारण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत. मंडळांना त्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. उभारण्यात आलेल्या मंडपावर लेखी प्रमाणपत्रे लावावे लागणार आहेत. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणाच्या पथकाची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. हे पथक उत्सव सुरू होण्यापूर्वी सात दिवस अगोदर मंडपांना भेटी देऊन परवानगीचा तपशील दर्शनी भागावर लावला आहे की नाही याची तपासणी करणार आहे. परवानगी तपशील लावल्यास सदर मंडप अनधिकृत आहे, असे समजून आयुक्तांच्या नजरेस आणून देण्यात येणार आहे.