आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N.D.Mahanor News In Marathi, Poet, Marathwada Sahitya Parishad, Divya Marathi

माझ्या कवितेला लाभले काळ्या मातीचे सौंदर्य,ना. धों. महानोर यांचे उद्गार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - माझ्या कवितेतील सौंदर्य हे काळ्या मातीतून आले आहे. ज्याची वाट ही माणसाच्या, शेतीच्या आणि कुटुंबातील सुख-दु:खातून जाते. त्यामुळेच या काळ्या मातीचा प्रभाव कवितेत दिसून येतो. माझी कविता नेहमीच निसर्गाचे दु:ख हरण करणारी आहे, असे भावनिक उद्गार कविवर्य पद्मश्री ना. धों. महानोर यांनी काढले.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा जीवनगौरव पुरस्कार यंदा महानोर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते मनोगत व्यक्त करत होते. मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, वैद्यकीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रवी बापट, प्राचार्य प्रताप बोराडे, डॉ. दादा गोरे, डॉ. चंद्रकांत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बापट यांच्या हस्ते महानोर यांनी हा पुरस्कार सपत्नीक स्वीकारला. 25 हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महानोर म्हणाले, ज्या परिषेदेने मला मोठे केले, त्यांचा हा पुरस्कारही मोठा आहे. माणूस केवळ कार्यकर्तृत्वानेच मोठा होत नाही, तर सर्वांचा सहवास आणि विविध क्षेत्रांची जोड आवश्यक आहे. याबरोबरच केवळ पुस्तक वाचल्यानेच जगाचा अनुभव येतो असे नाही, तर परिस्थिती आणि कुठे तरी चांगले काम केल्याचे समाधानही खूप मोठी शिकवण देत असते. तसेच छोटी छोटी संमेलनेही साहित्यिक आणि कवींसाठी आवश्यक आहेत. ज्यांनी सुरुवातीला आपल्या कविता नाकारल्या, त्याच कवितांना या प्रादेशिक संमेलनांतून सन्मान मिळत गेला, असेही महानोर म्हणाले.
प्राचार्य बोराडे यांनी महानोरांच्या कार्याविषयी सांगितले की, महानोरांना रानातल्या कवितांनीच मोठा मित्र परिवार मिळवून दिला. त्या केवळ कविताच नाहीत, तर माणसाचे वास्तव मांडणारे जग आहे.
डॉ. पाटील म्हणाले, कवितेतील वेगळ्या विषयांमुळेच हा रानातला कवी हीरो झाला आहे. कारण परदेशातही ज्याच्या कविता अभ्यासल्या जातात त्या कविता दुसर्‍या कोणाच्या नसून त्या महानोर यांच्या अस्सल मराठमोळ्या कविताच आहेत. या पुरस्कारामुळे परिषदेचीही शान वाढली आहे, असेही डॉ. पाटील म्हणाले. प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रास्ताविक केले. दादा गोरे यांनी सूत्रसंचालन केले.