आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एन-मार्ट मॉलला संशयास्पद आग, पाच लाखांचे नुकसान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एसएससी बोर्डासमोरील एन-मार्ट मॉलला मंगळवारी सकाळी 11.30 वाजता अचानक आग लागली. या आगीत पाच लाख रुपयांचे साहित्य जळाल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. वीजपुरवठा खंडित असताना आग लागल्याने संशय व्यक्त होत आहे.


मंगळवारी सकाळी मॉलच्या शटरखालून धूर निघत असल्याने रस्त्यावरून जाणार्‍या काही नागरिकांनी याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला कळवली. क्रांती चौक पोलिसांसह अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मॉलच्या पाठीमागील शटर उचकटवत अग्निशमन दलाच्या जवानांनी आत प्रवेश करून पाण्याचा मारा केला. अग्निशमन दलाचे दोन बंब आणि एक टँकर घटनास्थळी होते. तासाभरानंतर आग आटोक्यात आली. त्यानंतर तीन मजली मॉलची अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहणी केली. पाण्याच्या मार्‍याने आणि आगीने धान्य, टेबल खुच्र्या, चॉकलेट्स, गोळ्या, बिस्कीटे आदी सामानाचे नुकसान झाले. दीड वर्षांपासून मॉलला सील ठोकण्यात आलेले आहे. तत्पूर्वीच मॉलचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर जीटीएलच्या कर्मचार्‍यांनीदेखील या परिसरातील डीपीतून होणारा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे परिसरातील वीज एक तास गुल होती. आग आटोक्यात आल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.


सोनकांबळेंची तक्रार
या कंपनीने शासन व नागरिकांना खोटी माहिती दिली. यानंतर देशभरात एन-मार्ट मॉल स्थापन करून कोट्यवधींचा घोटाळा केला. शहरात सुमारे 28 हजार सभासद तयार केले. 24 ऑक्टोबर 2012 रोजी अचानक दोन्ही मॉल बंद करण्यात आले. बक्षीस व स्पर्धा या अधिनियमाखाली कंपनीची मालमत्ता जप्त करण्यात यावी अशा स्वरूपाची याचिका सामाजिक कार्यकर्ते अनिलकुमार सोनकांबळे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने जानेवारी 2013 मध्ये क्रांती चौक पोलिसांनी पैठण रोड आणि एसएससी बोर्ड शेजारील मॉलला सील ठोकले होते.

फसवणूक नाही
काही सभासद घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एन-मार्टने आमची फसवणूक केली नसल्याचा दावा केला. मॉल पुन्हा सुरू होत असल्याचे समजल्याने कोणीतरी मुद्दाम आग लावल्याचा संशय सभासदांनी व्यक्त केला.

आग लावली
मॉलला सील ठोकण्यापूर्वी जीटीएलने वीजपुरवठा खंडित केला होता. नागरिकांची फसवणूक केल्याचे स्पष्ट करणारे दस्तऐवज कुणाच्या हाती लागू नये, यासाठीच आग लावण्यात आली, असा आरोप सोनकांबळे यांनी केला आहे.

सुरक्षा रक्षक नाही
या मॉलमध्ये लाखो रुपयांचे सामान असतानाही सुरक्षा रक्षक नेमण्यात आला नाही. या मॉलमध्ये वर्षभरापूर्वी चोरी झाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने वर्षभरात चौघांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा माल जप्त केला होता.