आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naac Give A Grade To Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नॅकने दिला ‘अ’ दर्जा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नॅशनल असेसमेंट्स अँड अँक्रिडिटेशन कौन्सिल म्हणजेच ‘नॅक’ने शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ‘अ’ मानांकन दिले. मुंबई, पुण्यानंतर ‘अ’ मानांकन मिळवणारे येथील विद्यापीठ राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचे ठरले आहे. प्रयोगशाळा, ग्रंथालय, विद्यार्थी वसतिगृहांसह पायाभूत सुविधा आणि अकॅडमिक अँक्टिव्हिटीलासमितीने उत्तम पसंती दिल्यामुळे ‘अ’ श्रेणी मिळाली. ‘नॅक’ने ई-मेल पाठवून ही आनंदाची बातमी कळवली. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांचा कर्मचारी, शिक्षकांनी शनिवारी दुपारी सत्कार केला.

विद्यापीठात यंदा 27 ते 30 ऑगस्टदरम्यान डॉ. पी. एस. झकारियास यांच्या अध्यक्षतेखालील पीअर टीमने भेट दिली. ‘नॅक’ समन्वयक डॉ. जगन्नाथ पाटील यांच्यासह नऊ सदस्यीय समिती फेरमूल्यांकनासाठी विद्यापीठात आली होती. विद्यापीठातील पायाभूत सुविधा, अकॅडमिक अँक्टिव्हिटीची त्याच वेळी समितीने स्तुती केली असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. यूजीसीला अहवाल सादर केल्यानंतर शुक्रवार, शनिवारी बंगळुरू येथे ‘नॅक’ची अंतिम बैठक झाली. विद्यापीठाचे हे पुनर्मूल्यांकन असून नऊ वर्षांनंतर विद्यापीठाने दुसर्‍यांदा नॅक प्रक्रियेत भाग घेतला. ‘अ’ दर्जा मिळाल्याचे वृत्त विद्यापीठात येऊन धडकताच विद्यार्थी, शिक्षक, कर्मचार्‍यांनी आनंदोत्सव साजरा केल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

अभिनंदनाचा वर्षाव : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, राज्यपाल तथा कुलपतींचे सचिव डॉ. विकासचंद्र रस्तोगी यांनी दूरध्वनीद्वारे कुलगुरूंचे अभिनंदन केले. अकॅडमिक स्टाफ कॉलेजचे संचालक डॉ. अरुण खरात, डॉ. धनंजय माने, बामुटाचे अध्यक्ष डॉ. सतीश पाटील, डॉ. राम चव्हाण यांनी कुलगुरूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ई-मेल मिळाल्यानंतर कुलगुरूंनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बीसीयूडी संचालक डॉ. एस. पी. झांबरे, कुलसचिव डॉ. धनराज माने, आयक्वॅकचे संचालक डॉ. वि. ल. धारूरकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. गीता पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, डॉ. एस. टी. सांगळे आणि डॉ. वाल्मीक सरवदे आदींची उपस्थिती होती.


वाढीव निधी मिळेल
राज्यातील विद्यापीठांच्या तुलनेत चांगली कामगिरी केल्याचा आनंद आहे. ‘नॅक’च्या र्शेणीमुळे विद्यार्थी संख्या वाढणार यात शंकाच नाही. त्याशिवाय यूजीसी, केंद्र आणि राज्य सरकारकडून भरघोस निधीही प्राप्त होईल. डॉ. विजय पांढरीपांडे, कुलगुरू.


प्रयोगशाळा, वसतिगृहे आवडली
भौतिक सुविधा, उत्तम शिक्षण, हिरवाईने नटलेला परिसर, ग्रंथालय, विज्ञान शाखांच्या प्रयोगशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेली सुसज्ज वसतिगृहे आदी सुविधा समितीला आवडल्याचे कुलगुरूंनी सांगितले. समितीने 4 पैकी 3.07 गुणांकन विद्यापीठाला दिले असून देशातील सहाशेपैकी 150 विद्यापीठांनाच नॅकचे मानांकन मिळाले आहे. त्यापैकी ‘अ’श्रेणी मिळवणारी देशात 60 विद्यापीठे असून राज्यातील केवळ तीन विद्यापीठांच्याच वाट्याला हे यश आले आहे.